नवी दिल्ली – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) बद्दलची शंका फेटाळून लावली आणि लोकांना ईव्हीएम मध्ये नोंदवण्यात आलेले त्यांचे मत सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे. ते म्हणाले की, ईव्हीएम १०० टक्के सुरक्षित आहेत कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात तांत्रिक, प्रशासकीय आणि प्रक्रिया-केंद्रित सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत. ईव्हीएमचा हा मुद्दा निकाली निघालेला मुद्दा आहे. न्यायालयात त्यावर सुनावणी झाली आहे आता आम्ही निकालाची वाट पाहत आहोत. या मशिन्सला काहीही होऊ शकत नाही. प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांच्या पुढे त्यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे असे ते म्हणाले. आता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून आता नागरीकांनी फक्त मतदानाचा आनंद घ्यावा, मतदानाचा आनंद घेण्याची ही वेळ आहे, शंका घेण्याची ही वेळ नाही असेही त्यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ मतदारसंघात शुक्रवारी मतदान झाले.या मतदानाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे असे त्यांनी नमूद केले. यावेळी मतदानाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने मेाठी मोहीम राबवली होती. ज्या मतदार संघात कमी मतदान हेाते त्यावर आम्ही विशेष लक्ष केंद्रीत केले होते असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी नमूद केले.