विलपॉवर हॅरीस : घोलप महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासाचे धडे
पिंपळे गुरव : माणसानं दयाळू असणे आवश्यक आहे, तसेच आपल्यातील दयाळूपणाचा फायदा दुसऱ्यांना देखील झाला पाहिजे, कारण चांगला स्वभाव हा आपल्याला यशाकडे घेऊन जाणारा मार्ग ठरतो, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय लेखक व अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक विलपॉवर हॅरीस यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालय व यु. एस. ए येथील विलपॉवर कन्सल्टेशन संस्था यांच्या वतीने बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, व्यावसायिक अभ्यासक्रम समन्वयक डॉ. योगेश खोल्लम आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, बदलत्या काळानुसार आपल्यामधील संवाद व संभाषण कमी झाले आहे. आयुष्यामध्ये आपण लोकांना ज्या गोष्टी देणार आहोत. त्याच गोष्टी भविष्यामध्ये आपल्याला दुप्पट मिळणार आहेत. त्यामुळे नेहमी अंतःकरणात दयाळू पणाची भावना ठेवून, प्रत्येकाला सदैव मदत करण्यासाठी तत्पर असले पाहिजे, असे आवाहन केले.
या वेळी चर्चासत्रामध्ये उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल निकिता शाह व अथर्व धारनकर या दोन विद्यार्थ्यांना विलपावर हॅरिस यांच्या स्वाक्षरीने पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दिपाली जोशी, प्रा. सोमीनाथ आव्हाड, प्रा. रूपाली रसाळे, प्रणित पावले, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे सुमारे 250 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सद्दाम घाटवाले यांनी केले. प्रा. धनश्री कुलकर्णी यांनी आभार मानले.