गणेशोत्सव-मोहरम बैठकीत उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सूचना
लोणावळा – गणेशोत्सव काळातील नियम आणि कायदे हे सर्वांना समान असतात. सर्वांनाच याची माहिती असते. परंतु, त्याची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लोणावळा उपविभागीय अधिकारी नवनीत कावत यांनी केले.
गणेशोत्सव तसेच मोहरमच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुरुवारी बैठक घेण्यात आली. बैठकीला शहरातील लहान मोठ्या सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना तसेच मुस्लिम समाजातील प्रतिनिधींना बोलाविण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, स.पो.नि.वैभव स्वामी, संजय ठेंगे यांच्यासह शहरातील आजी-माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनीत कावत म्हणाले, पोलिसांचा रंग खाकी असून पोलिसांना कोणताही धर्म, जात नसल्याचे सांगत, पोलीस हे देशसेवेसाठी असून नागरिकांच्या सहयोगानेच ते आपले काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या की, गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाची वापर टाळून, गणेश मूर्तींचे विसर्जन नगरपरिषदेने तयार केलेल्या विसर्जन कुंडातच करावे, अशी विनंती उपस्थित गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना केले. पो.नि.बी.आर.पाटील यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कसबेकर यांनी केले. स.पो.नि. संजय ठेंगे यांनी आभार मानले. लोणावळा शहर पोलीस स्टेशन वतीने आयोजित समूहगीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ शांतता कमिटीच्या कार्यक्रमा दरम्यान घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. लहान गटात गुरुकुल मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी तर मोठ्या गटात व्ही. पी. एस. हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली.
मोठा गट
प्रथम क्रमांक : व्ही.पी.एस.हायस्कूल
द्वितीय क्रमांक : ऍड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल
तृतीय क्रमांक : गुरुकुल हायस्कूल मराठी माध्यम
चतुर्थ क्रमांक : डॉन बॉस्को हायस्कूल
पंचम क्रमांक : प्रा. रामकृष्ण मोरे विद्यालय, खंडाळा
लहान गट
प्रथम क्रमांक : गुरुकुल हायस्कूल मराठी माध्यम
द्वितीय क्रमांक : संत गाडगेबाबा शाळा क्र.10
तृतीय क्रमांक : लोणावळा नगरपरिषद शाळा क्र.1
चतुर्थ क्रमांक : संत ज्ञानेश्वर विद्यालय, भांगरवाडी
पंचम क्रमांक : रायवूड इंटरनॅशनल स्कूल