Mosquito Bites: घरात सगळे आहेत, पण डास तुम्हालाच जास्त चावतात? शरीरातील ‘या’ ५ गोष्टी आहेत कारणीभूत!
Mosquito Bites आपल्या शरीरातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड, शरीराचा नैसर्गिक वास आणि कपड्यांचा रंग अशा अनेक गोष्टी डासांना आकर्षित करू शकतात.

Mosquito Bites: पावसाळा असो किंवा हिवाळा, डासांचा त्रास काही कमी होत नाही. घरात किंवा एखाद्या ठिकाणी अनेकजण एकत्र बसलेले असतात. मात्र, अशावेळी काही लोकांना डास जास्त चावतात, तर काही जणांना डासांचा फारसा त्रास होत नाही. तुम्हीही असा अनुभव घेतला असेल की, आजूबाजूला अनेक लोक असूनही डास नेमके तुम्हालाच जास्त चावतात. अशावेळी अनेकजण गंमतीने तुम्ही गोड आहात म्हणून डास तुमच्याकडे येतात, असं म्हणतात. पण खरंच असं असतं का? तर यामागे काही वैज्ञानिक कारणं आहेत. आपल्या शरीरातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड, शरीराचा नैसर्गिक वास आणि कपड्यांचा रंग अशा अनेक गोष्टी डासांना आकर्षित करू शकतात.
चला तर मग जाणून घेऊया, काही लोकांना डास जास्त का चावतात?
१. शरीरातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड
डासांना माणसांचा शोध घेण्यासाठी कार्बन डायऑक्साइडची मदत होते. आपण श्वास सोडताना कार्बन डायऑक्साइड हा वायू बाहेर टाकतो. डासांना हा वायू दूरवरूनही ओळखता येतो. त्यामुळे एखादी व्यक्ती आसपास असल्याचा अंदाज त्यांना येतो. विशेष म्हणजे, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे काही व्यक्ती डासांना अधिक आकर्षित करू शकतात.
२. शरीराचा नैसर्गिक वास
प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा नैसर्गिक वास वेगळा असतो. आपल्या त्वचेवर असणारे सूक्ष्मजीव, घाम आणि त्वचेतून बाहेर पडणारे काही रासायनिक घटक यांमुळे शरीराचा वास तयार होतो. डासांना काही विशिष्ट प्रकारचे वास अधिक आकर्षित करतात. त्यामुळे एकाच ठिकाणी बसलेल्या दोन व्यक्तींपैकी एखाद्या व्यक्तीकडे डास अधिक आकर्षित होऊ शकतात. यामध्ये त्वचेवरील जीवाणू आणि त्यांच्यामुळे तयार होणाऱ्या रसायनांचाही सहभाग असतो.
३. शरीराचे तापमान आणि घाम
डासांना शरीरातून बाहेर पडणारी उष्णता आणि घामातील काही रासायनिक घटक आकर्षित करतात. शारीरिक हालचाली किंवा व्यायाम केल्यानंतर शरीराचं तापमान वाढतं आणि घामही जास्त येतो. अशावेळी डास व्यक्तीकडे अधिक आकर्षित होऊ शकतात. घामामध्ये लॅक्टिक अॅसिडसारखे काही घटक असतात. हे घटक डासांना माणसांचा शोध घेण्यास मदत करू शकतात. त्यामुळे काही लोकांना इतरांच्या तुलनेत डास जास्त चावतात.

Mosquito Bites
४. गडद रंगाचे कपडे
तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालता, याचाही डासांच्या आकर्षणाशी संबंध असू शकतो. काही संशोधनांनुसार डासांना काळा, गडद निळा आणि लाल यांसारखे गडद रंग अधिक आकर्षित करू शकतात. डास माणसांचा शोध घेताना केवळ वासाचाच नाही, तर डोळ्यांनी दिसणाऱ्या रंगांचाही वापर करतात. त्यामुळे गडद रंगाचे कपडे घातलेल्या व्यक्ती डासांना सहज दिसू शकतात. मात्र, कपड्यांचा रंग हा एकमेव घटक नसतो.
५. O रक्तगटाच्या व्यक्तींना डास जास्त चावतात का?
डासांच्या चावण्याबाबत रक्तगटाचाही उल्लेख केला जातो. विशेषतः O रक्तगट असलेल्या व्यक्तींना डास जास्त चावतात, असं अनेकदा सांगितलं जातं. काही संशोधनांमध्ये O रक्तगटाच्या व्यक्तींकडे डास अधिक आकर्षित होत असल्याचं दिसून आलं आहे.
मात्र, याबाबतचे पुरावे मर्यादित आहेत. केवळ रक्तगटामुळेच डास एखाद्या व्यक्तीला जास्त चावतात, असं ठामपणे सांगता येत नाही. शरीराचा वास, कार्बन डायऑक्साइड आणि इतर घटकही तितकेच महत्त्वाचे असतात.
डासांचा त्रास कमी करण्यासाठी काय कराल?
– घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका.
– पूर्ण बाह्यांचे आणि शक्यतो फिकट रंगाचे कपडे वापरा.
– डासांपासून संरक्षणासाठी योग्य रिपेलंटचा वापर करा.
– घराच्या खिडक्या आणि दरवाजांना जाळ्या लावा.
– झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
एकूणच, तुम्हाला इतरांपेक्षा डास जास्त चावत असतील, तर त्यामागे तुम्ही गोड आहात हे कारण नाही. तुमच्या शरीराचा वास, श्वासातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड आणि शरीराचं तापमान अशा अनेक गोष्टी त्यामागे असू शकतात. त्यामुळे डासांपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे.





