पाकिस्तानात दरवर्षी हजारो महिलांचे होतेय धर्मांतर आणि शोषण

न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या चर्चेला संबोधित करताना, न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली. पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले की, या महत्त्वाच्या वार्षिक चर्चेत राजकीय प्रचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्या देशातील अल्पसंख्याक समाजातील, विशेषत: हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांच्या महिलांची स्थिती दयनीय आहे, हे आपण जाणतो.पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायातील महिलांच्या दयनीय स्थितीला प्रतिसाद दिला पाहिजे.
हरीश यांनी सांगितले की, त्या विशिष्ट देशाच्या मानवाधिकार आयोगाच्या आकडेवारीनुसार, अल्पसंख्याक समुदायातील अंदाजे हजारो महिला दरवर्षी अपहरण, जबरदस्तीने धर्मांतर आणि जबरदस्तीने विवाहाला बळी पडतात. त्यांना जबरदस्तीने धर्मांतराकडे ढकलले जात आहे. मी अजून खूप काही बोलू शकलो असतो, पण मी इथेच संपवतो. सुरक्षा परिषदेमध्ये चर्चेदरम्यान पाकिस्तानच्या प्रतिनिधीने जम्मू आणि काश्मीरचा उल्लेख केल्यानंतर त्यांची टिप्पणी आली.
यासोबतच हरीश म्हणाले की, भारत महिला, शांतता आणि सुरक्षा अजेंडा यांच्याप्रती आपल्या अतूट वचनबद्धतेची पुष्टी करतो. आमचा विश्वास आहे की शाश्वत शांततेसाठी राजकारण, प्रशासन, संस्था उभारणी, कायद्याचे राज्य, सुरक्षा क्षेत्र आणि आर्थिक सुधारणांसह निर्णय घेण्याच्या सर्व स्तरांवर महिलांचा पूर्ण, समान, अर्थपूर्ण आणि सुरक्षित सहभाग आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे लोकसंख्येचे आणि विशेषतः महिलांचे आर्थिक आणि सामाजिक कल्याण हे शाश्वत शांततेसाठी अविभाज्य आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.





