भुज : भारत देशात घुसलेल्या प्रत्येक घुसखोराला हुडकून काढेल आणि त्याला मतदान करु देणार नाही, असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या ६१ व्या स्थापना दिनानिमित्त ते जवानांना संबोधित करत होते. शाह यांनी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी १२ राज्यांमध्ये मतदार याद्यांच्या सुरू असलेल्या विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) बाबत नागरिकांना संबोधित केले. त्यांनी सांगितले की, भारतीय नागरिकांनी याला पूर्ण पाठिंबा द्यावा, कारण ही प्रक्रिया देशाच्या आणि लोकशाहीच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे. याद्वारे, प्रत्येक घुसखोराला मतदार यादीतून काढून टाकले जाईल. शाह आपल्या भाषणात म्हणाले, “आज मी हे स्पष्ट करू इच्छितो की आम्ही या देशातील प्रत्येक घुसखोराला हाकलून लावू. ही आमची प्रतिज्ञा आहे. एसआयआर प्रक्रिया देशाच्या आणि लोकशाहीच्या सुरक्षेसाठी आहे.” विरोधी आघाडीतील पक्षांचे नाव न घेता, केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की काही राजकीय पक्ष घुसखोरांना हाकलून लावण्याच्या मोहिमेला कमकुवत करू इच्छितात. बिहार निवडणुकीचा दाखला देत ते म्हणाले की, जनतेने या मुद्द्यावर एनडीएला बहुमत दिले आहे. शाह म्हणाले, “मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या एसआयआर प्रक्रियेला काही राजकीय पक्ष विरोध करत आहेत हे दुर्दैवी आहे.”