पिंपरी – पिंपरी येथील शगुन चौकामध्ये फूलबाजार भरत होता. या बाजाराचे स्थलांतर करण्याचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. आज क्रोमा शेजारील जागेत त्याचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे शगून चौकात वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
पिंपरीतील फूल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक होते. याठिकाणी खरेदीसाठी नागरिक नेहमी गर्दी करत. मात्र फूल बाजारात आवश्यक जागा उपलब्ध नसल्याने शगुन चौकातील जागा अपुरी पडत होती. त्यामुळे त्या ठिकाणी वापर करण्यास अडचण होत होती. तसेच वाहतूकीसाठीही अडथळा होत होता. जागेअभावी गेल्या 15 वर्षांपासून फूल बाजार पहाटे सहा ते नऊ या वेळेतच पिंपरीतील शगुन चौकात भरत होता.
कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सन 2017 पासून महापालिकेकडे कायमस्वरुपी जागेची मागणी केली जात होती. त्या अनुषंगाने महापालिकेच्या भूमी जिंदगी विभागाने पिंपरीतील क्रोमा शोरुमशेजारील जागेची पाहणी केली. त्यानंतर ही जागा फूलबाजारासाठी कायमस्वरुपी भाड्याने देण्याचे मान्य केले होते.
महापालिकेच्या वतीने याठिकाणी 5 हजार 500 चौरस फूट जागेत घाऊक फूलबाजासाठी 27 गाळे निर्माण केले आहेत. संबंधित फूलबाजाराचे उद्घाटन तत्कालीन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते नोव्हेंबर 2019 मध्ये झाले. तेव्हापासून आतापर्यंत फूलबाजार बंद होता. या बाजारात पाणी आणि वीजपुरवठा उपलब्ध व्हावा अशी विक्रेत्यांची मागणी होती. त्यानुसार जलवाहिनी टाकण्यात आली. त्यानंतर अखेर आज (शनिवार) फूलबाजाराचे स्थलांतर करण्यात आले.