Farz Movie : 12 आठवडे चित्रपटगृहं होती रिकामी, तरी जितेंद्र यांनी हार मानली नाही; ‘फर्ज’च्या यशामागचा रंजक किस्सा
Farz Movie : अनेक संकटांचा सामना करत त्यांनी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणाऱ्या ‘फर्ज’ चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा आजही चर्चेत आहे.

Farz Movie : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि खास नृत्यशैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे अभिनेते जितेंद्र यांनी १९७० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मुंबईतील अवघ्या दहा बाय दहाच्या खोलीत राहून त्यांनी मोठी स्वप्नं पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. चाळीत गेलेलं बालपण, संघर्षाचे दिवस आणि करिअरच्या सुरुवातीला आलेल्या अडचणी या सगळ्यांचा त्यांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडला. अनेक संकटांचा सामना करत त्यांनी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणाऱ्या ‘फर्ज’ चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा आजही चर्चेत आहे.
‘फर्ज’ ठरला जितेंद्र यांच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट
जितेंद्र यांना सुरुवातीच्या काळात छोट्या भूमिका मिळत होत्या. मात्र, १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फर्ज’ या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला नवी दिशा दिली. या चित्रपटासाठी सुरुवातीला इतर अभिनेत्यांचा विचार करण्यात करण्यात आला होता. मनोज कुमार, फिरोज खान आणि शशी कपूर यांनी भूमिका नाकारल्यानंतर ही संधी जितेंद्र यांना मिळाली आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं.
दिग्दर्शक रविकांत नगाइच यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जितेंद्र आणि बबिता यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. चित्रपटातील गाणी आणि संगीतानेही त्याच्या लोकप्रियतेत मोठी भर घातली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत आणि आनंद बक्षी यांची गीते यामुळे ‘फर्ज’मधील गाणी विशेष गाजली. या चित्रपटात सज्जन, आगा, मुकरी, मोहन छोटी, डेव्हिड अब्राहम चेउलकर आणि अरुणा इराणी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
चित्रपटगृहांत प्रेक्षकांचा प्रतिसाद नव्हता; जितेंद्र यांनी काय केलं?
‘फर्ज’च्या यशाबाबत सांगितला जाणारा एक किस्सा विशेष लक्षवेधी आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत नसल्याने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची वेळ येईल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. अशा वेळी जितेंद्र यांनी चित्रपटाला आणखी संधी देण्याचा आग्रह धरला होता. चित्रपट किमान १५ आठवडे चित्रपटगृहांत सुरू राहावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी थेट चित्रपटगृह मालकांसोबत चर्चा केली होती. त्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि त्याची लोकप्रियता वाढत गेली.
कमी बजेटमध्ये बनला, कमाई मात्र कोट्यवधींची!
‘फर्ज’ चित्रपटाच्या बजेट आणि कमाईबाबतही विविध आकडे सांगितले जातात. सुरुवातीला चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे आठ लाख रुपये खर्च झाल्याचे म्हटले जाते. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अतिरिक्त प्रिंट्स काढण्यात आल्याने खर्च वाढून अंदाजे २० लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला जातो. त्याचवेळी चित्रपटाने सुमारे अडीच कोटी रुपयांची कमाई केल्याचेही सांगितले जाते.
‘फर्ज’च्या यशानंतर जितेंद्र यांच्यासाठी चित्रपटसृष्टीतील संधी वाढत गेल्या. पुढे ‘हिम्मतवाला’, ‘तोहफा’, ‘नागिन’ आणि ‘आशा’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेता म्हणून स्थान निर्माण केले. जितेंद्र यांच्या कारकिर्दीतील ‘फर्ज’ हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. संघर्षाच्या काळात मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून त्यांनी यशाचा मार्ग कसा गाठला, याची आठवण हा चित्रपट आजही करून देतो.






