राष्ट्रवादीत फूट असली तरी शरद पवारच “दैवत’: अजित पवारांचे सूचक वक्तव्य

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी शरद पवार हेच आमचे दैवत आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. पिंपरीत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, “कालही आम्ही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता मिळाला आहे. त्यांनी देशाची मान जगात उंचावली आहे. त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी हा निर्णय घेतला.” यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.
अजित पवारांनी जागतिक आर्थिक संकटावरही भाष्य केले. ते म्हणाले, “अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्याने अनेक देशांवर परिणाम झाला आहे. कोरोनानंतर हे नवे संकट आहे. पण मोदींनी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा फायदा आपल्याला होईल.” त्यांनी कार्यकर्त्यांना “तळ्यात-मळ्यात” न राहण्याचा सल्ला देत अण्णा बनसोडे यांचे कौतुक केले. “पानटपरी ते विधानसभा उपाध्यक्ष हा अण्णांचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता भान ठेवून वागा आणि बोला, कारण सर्वांचे लक्ष तुमच्यावर आहे,” असे त्यांनी सांगितले.
पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी ताकीद दिली. “कोयता गँग, अमुक-तमुक गँग चालणार नाही. कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवा,” असा दम त्यांनी भरला. अजित पवारांच्या या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.





