Jaykumar Gore : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीची जोरदार चर्चा राज्यभरात झाली. याचे कारण म्हणजे या निवडणुकीसाठी घडलेल्या नाट्यमय घडामोडी. सुरूवातीलाच येथून भाजपचे १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले. पण त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी घडलेली नाट्यमय घडना सर्वांच्याच लक्षात राहिली. सूचकाची सही नसल्याने नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. यामुळे भाजप नेते राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी झाली. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रापासून दिल्लीपासून अमेरिकेपर्यंत नाव झाले, अमेरिकेतले लोक सुद्धा म्हणत आहेत ते अनगर कुठे आहे? राजन पाटील कोण आहेत? असे विधान जयकुमार गोरे यांनी केले. असं म्हणताच व्यासपीठावरून राजन पाटील यांनी ‘किती शिव्या खातोय’ असं म्हटलं, यावर पाटील जो शिव्या खातो तोच मोठा होतो, असे म्हटले. राजन पाटील मालक यांच्यातील प्रचंड ऊर्जा ताकद कार्यकर्त्यांमध्ये आली आहे, असे कौतुक करणारे विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. मोहोळ नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्या प्रचार सभेनिमित्त एका ठिकाणी जयकुमार गोरे यांनी वरील विधान केले. कोण आहेत राजन पाटील? अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदावरून राजन पाटील यांचे नाव गेल्या आठ ते दहा दिवसांपासून माध्यमात चर्चेत आले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हाच मुद्दा पकडत राजन पाटील यांची चर्चा महाराष्ट्र ते दिल्ली आणि दिल्लीपासून अमेरिकेपर्यंत असल्याचे म्हटले आहे. राजन पाटील हे मोहोळ–वैराग मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले आहेत, सोलापुरसह राज्याच्या राजकारणातील ते ज्येष्ठ राजकारणी आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षाच्या धोरणावर टीका करत राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हेही वाचा : samantha ruth prabhu: “मी हार मानली नाही…” आजारावर मात करून साउथ अभिनेत्रीचे जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन