“सत्तेवर बसलेली लोकं पुरुष जरी असते तर…”; उपराष्ट्रपतींच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांची टीका

Sanjay Raut : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांनी आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) कौतुक केले होते. यावेळी त्यांनी मोदींची तुलना थेट महात्मा गांधी यांच्याशी केली होती. यामुळे राजकीय वर्तुळात सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरू झाली. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील जगदीप धनखड यांच्या विधानाबाबत भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
उपराष्ट्रपतींच्या या विधानावरून संजय राऊत म्हणाले की, “कोण युगपुरुष आहेत, कोण महापुरुष आहेत हे आपण ठरवत नाही. जनता ठरवते, इतिहास ठरवतो. महात्मा गांधींना अवघ्या जगाने मानले आहे. २०२४ नंतर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहा. सत्तेत बसणारे लोक पुरुष जरी असते तर जम्मू-काश्मीरमध्ये दररोज आपल्या जवानांची हत्या झाली नसती. लडाखमध्ये चीन घुसला नसता. पंतप्रधानांचा आम्ही आदर करतो कारण ते पंतप्रधान आहेत. त्या पदाचा आम्ही आदर करतो.”
महाराष्ट्रातील नेते तेलंगणात प्रचारासाठी गेले, त्यावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे. अशावेळी राज्याच्या प्रमुखांनी राज्यात असायला पाहिजे की तिथे जाऊन प्रचार करायला पाहिजे? तुम्हाला खोके पाठवायचे असतील तर पाठवा. पण आज खोक्यांची मदत शेतकऱ्याला पाहिजे. तुम्हाला तिथे कोण विचारतंय? इथे थांबा की. तुमच्याशिवाय तेलंगणात निवडणुका होणार नाही का?” असा सवालही राऊतांनी केला. याशिवाय तेलंगणात भाजप जिंकणार नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड काय म्हणाले होते?
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एका कार्यक्रमात बोलताना मोदींची तुलना महात्मा गांधींशी केली. “गेल्या शतकातील महापुरुष महात्मा गांधी होते. नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष आहेत. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेने आपल्याला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले”, जगदीप धनखड म्हणाले होते.





