Pune News – महिला उच्चशिक्षित असली, तरीही तिला नोकरी नाही. त्यामुळे तिला सहकार्य करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष काढत दरमहा १० हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के.व्ही.ठाकुर यांनी सीए (चार्टर्ड अकाउंटंट) पतीला दिला आहे. अर्ज दाखल केलेल्या तारखेपासून म्हणजे ११ जून २०२४ पासून ही पोटगी द्यावी लागणार आहे. माधव सी.ए. आहे. तर माधवी गृहिणी आहे. ती अॅड. तेजस संजय पवार यांच्यामार्फत न्यायालयात हजर झाली. त्याने विनाकारण तिला घरातून बाहेर काढले आहे. ती सध्या कमवत नाही. पती सीए आहे. त्याची शेअर बाजारात गुंतवणूक आहे. जमीन आहे. यातून त्याला चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे उपजिविका आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अंतरिम पोटगीची मागणी करण्यात आली. यास पतीच्या बाजून विरोध करण्यात आला. तिचे शिक्षण एमबीए झाले आहे. ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. पैसे कमवू शकते. पतीला ६१ हजार रुपये पगार आहे. या पगाराची स्लीप न्यायालयात दाखल केली आहे. त्याला दरमहा ३४ हजार रुपये घराचा हप्ता आहे. आई-वडिल आणि आजीचे अवलंबत्व त्याच्यावर आहे. त्यामुळे पोटगी फेटाळण्याची मागणी न्यायालयात केली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकुण न्यायालयाने अंतरिम पोटगीचा आदेश दिला. न्यायालयीन प्रक्रीया सुरू असताना महिलांना आर्थिकदृष्ट्या असुरक्षित राहु नये, यासाठी यासाठी अंतरिम पोटगी महत्त्वाची ठरते. हा केवळ आदेश नाही, तर न्यायालयाने महिलांचा केलेला सन्मान आणि जगण्यासाठी दिलेला आधार आहे. – अॅड. तेजस संजय पवार, पत्नीचे वकील