प्रभात वृत्तसेवा पुणे : पालिकेच्या सिंहगड रस्त्यावरील वीरबाजी पासलरकर पुलाच्या बाजूच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पार्थिव घेऊन आलेल्या नागरिकांना अर्ध्या तासाहून अधिक वेळ ताटकळत राहवे लागले. गुरुवारी सायंकाळच्या घटनेवर पालिकेच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, अंत्यविधीसाठी पार्थिव घेऊन येणार असल्याची पूर्वसूचना नातेवाईकांनी दोन तास आधी दिली होती, तरीही कर्मचारी निघून गेल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अंत्यविधीसाठी ठेकेदारांनी कर्मचारी नेमले आहेत. माणिकबागमधील एका ज्येष्ठेचे निधन झाल्यावर नातेवाईकांनी वडगावच्या स्मशानभूमीत गॅस दाहिनीत अंत्यविधी करण्याचे ठरवले. अंत्यविधीचा पास मिळवून नातेवाईकांनी सायंकाळी सात वाजता अंत्यविधीसाठी येणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना दिली होती. पार्थिवासह नातेवाईक, मित्रपरिवार सात वाजता आला तेव्हा तेव्हा कार्यालय बंद होते. गॅस दाहिनीचे शटर खाली केले होते. येथे तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून एकही जागेवर नव्हता. गॅस दाहिनीच्या ऑपरेटरशी संपर्क साधला असता, दहा मिनिटांत येतो, असे सांगितले. प्रत्यक्षात तो अर्ध्या तासानंतर आल्यावर पालिकेला फोन कोणी केला?अशी दमदाटी नातेवाईकांना केली. या वेळी भाजपचे शहर सरचिटणीस दीपक नागपूरे यांनी त्याला फैलावर घेतले. पालिकेच्या विद्युत विभागाकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.