प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत गुरुवारी (दि. २०) उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून पाच उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे एकूण सात जणांनी माघार घेतली असून आता ९३ उमेदवार अद्याप रिंगणात आहेत.संगीता महेंद्र साळवे (प्रभाग २ ब), सुनील भिवा करंजे (प्रभाग ३-ब), किरण सुरेश ढोरे (प्रभाग ४-ब), निर्मला नितीन पोटे (प्रभाग ४-ब), सचिन केशव टकले (प्रभाग ५-ब) या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. उमेदवारी मागे घेण्याचा आजचा अंतिम दिवस असल्याने अजून काही अर्ज मागे घेण्याची शक्यता असून निवडणुकीचे चित्र बदलू शकते.भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीतून ही निवडणूक लढवली जात आहे. उमेदवार वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून होत असून, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एकूण १४० अर्जांपैकी ४० अर्ज छाननीत बाद झाले. यातील ३५ उमेदवारांनी तक्रार अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले होते. प्राप्त झालेल्या सर्व हरकतींचा निपटारा करून उमेदवारांना लेखी उत्तर देण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगरपरिषदेच्या एकूण २८ जागांसाठी या निवडणुका होत असून प्रभागनिहाय वातावरण चुरशीचे दिसत आहे. दोन प्रभागांत महायुतीचे उमेदवार बिनविरोध तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत गुरूवारी (दि. २०) दोन उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यात महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप बाळासाहेब शेळके (प्रभाग क्र. २) आणि महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणेश मोहनराव काकडे (प्रभाग क्र. ४) या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकूण सहा उमेदवार बिनविरोध झाले असून, त्याची औपचारिक घोषणा निवडणूक विभागाकडून लवकरच करण्यात येणार आहे.