नवी दिल्ली – दिल्लीच्या समृद्धी योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा २५०० रुपये दिले जाणार आहेत. मात्र आज सरकारकडून घोषणा झाल्यानंतर आम आदमी पार्टीने जोरदार टीका सुरू केली आहे. रेखा गुप्ता यांच्या सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो आहे. आपचे खासदार संजय सिंह म्हणाले की, हे आश्वासन मोदी सरकारचा एक प्रकारचा जुमला आहे. या योजनेअंतर्गत १०% महिलांनाही लाभ मिळणार नसल्याचे उघड झाले आहे. बाहेर येत असलेल्या माहितीवरून असे दिसून येते की जेव्हा जेव्हा पंतप्रधान काही बोलतात तेव्हा देशातील जनतेने त्यावर अजिबात विश्वास ठेवू नये. कारण त्यांची सर्व आश्वासने केवळ भाषणबाजी ठरतात. उर्वरित तपशील उघड झाल्यानंतर तुम्हाला सर्व काही कळेल. दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी म्हणाल्या, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एका सभेत ८ मार्च रोजी महिलांच्या खात्यात २५०० रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. आज तो दिवस होता आणि दिल्लीच्या महिला वाट पाहत होत्या. पण, आज भाजपच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने हे सिद्ध केले आहे की ही हमी नव्हती तर पंतप्रधान मोदींचा जुमला होता. पैसे देणे तर सोडाच, महिलांना नोंदणीसाठी कोणतीही योजना किंवा पोर्टलही सापडले नाही. त्यांना फक्त ४ सदस्यांची समिती मिळाली आहे.