राज्य सरकारचा मोठा निर्णय ! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची केली स्थापना

मुंबई : महाराष्ट्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आज प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना केली आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापना करण्यात आली आहे. तसेच प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणावर सह-अध्यक्ष म्हणून साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून विजय नायडू यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा अधिकृत निर्णय जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद हे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यात आलं आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या प्राधिकरणासंदर्भात शासन आदेश जारी केला असून यामध्ये प्राधिकरणातील सदस्यांची माहिती देण्यात आली आहे.
या प्राधिकरणामध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त साताऱ्याचे जिल्हाधिकारी,पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रादेशिक संचालक, पुणे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक यांचा समावेश असणार आहे.





