मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक राजकीय पक्ष कामाला लागले असून सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने अनेक छोट्या मोठ्या राजकीय पक्षांच्या आघाड्या होत आहेत. याच पार्श्वभूमीवर नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक पक्षाने इतर पक्षांच्या साथीने महाराष्ट्र लोक विकास आघाडीची स्थापना केली. कनिष्क कांबळे व करुणा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या आघाडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील सामान्य नागरिकांचे वीज, पाणी, स्वच्छ रस्ते, आरोग्य,शिक्षण यासारखे मूलभूत प्रश्न कोणत्याही सत्ताधारी पक्षांनी सोडवले नसून बेरोजगारी आणि महिलांवरील अत्याचार देखील वाढले आहेत. आजवर विकासाच्या नावाखाली जनतेची केवळ दिशाभूलच केली आहे. त्यामुळेच सर्वसामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्याकरिताच महाराष्ट्र लोक विकास आघाडीची स्थापना झाली असून या पक्षाच्या वतीने राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या आघाडीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक पक्ष ( कनिष्क कांबळे) स्वराज्य शक्ती सेना ( करुणा मुंढे) राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्ष (डॉ.राजेश नागोसे) भारत जनाधार पार्टी (सुरेंद्र अरोरा) महाराष्ट्र विकास आघाडी (अण्णाराव पाटील) आणि राष्ट्रीय जनता दल( शिवाजी मस्के) या पक्षांचा समावेश आहे. लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आघाडीच्या वतीने मुंबईसह राज्यभरातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाची उमेदवारी घोषित करण्यात येणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक पक्षाचे नेते कनिष्क कांबळे यांनी सांगितले.