पुणे जिल्हा | अतिरिक्त जिल्हा, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सत्र न्यायालयाची स्थापना करा

नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सत्र न्यायालयाची स्थापना व्हावी अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
पुणे (सर्किट हाऊस) येथे आमदार बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन जुन्नर तालुक्यातील काही विशेष कामांच्या बाबतीत चर्चा केली.
यामध्ये जुन्नर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सत्र न्यायालयाची स्थापना व्हावी अशी जुन्नर तालुका बार असोसिएशनची अनेक वर्षापासून मागणी आहे.
न्यायालय स्थापनेसाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता झाली असून प्रस्तावाला मंजुरी मिळण्याबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली.
आ.बेनके यांनी त्याबाबतचे पत्र अजित पवार यांना दिले आहे. जुन्नर तालुक्याची भौगोलिक परस्थिती लक्षात घेता तसेच वाढत्या दाव्यांची संख्या लक्षात घेता व तालुक्यातील पक्षकारांचा विचार करता न्यायालय स्थापन होणे गरजेचे असल्याची मागणी जुन्नर बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी जुन्नर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. हेमंत भास्कर, उपाध्यक्ष अॅड. समीर पुरवंत, उपाध्यक्ष अॅड. हेमंत हाडवळे, सचिव अॅड. आशिष वानखेडे, ग्रंथपाल अॅड. समकित नानावटी आदी पदाधिकारी उपस्थित होते.





