पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनातील गंभीर त्रुटी व गोंधळ दूर करून, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केली आहे. बहल यांनी म्हटले आहे की मतदारयाद्यांच्या प्रभागनिहाय विभाजनात मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला असून निवडणूक आयोगाच्या दिनांक १६ जुलै, २०२५ च्या आदेशात स्पष्ट निर्देश दिलेले असूनही, प्रत्यक्ष अंमलबजावणीत गंभीर अनियमितता आढळल्या आहेत. आयोगाने आपल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, प्रभागाच्या हद्दीवर राहणाऱ्या मतदारांच्या संदर्भात विशेष दक्षता घेणे आणि त्यासाठी आवश्यकतेनुसार स्थळ निरीक्षण करणे आवश्यक आहे. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही शाहनिशा न करताच संपूर्ण यादी भाग किंवा परिसर परस्पर मूळ प्रभागाऐवजी दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे अनेक प्रभागांत ५ हजार पेक्षा जास्त मतदारांचा घोळ झाला आहे. ‘एका प्रभागाच्या हद्दीतील मतदारांची नावे अन्य प्रभागाच्या मतदार यादीत समाविष्ट’ होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. एकाच परिसरातील २०० ते ३०० नावे चुकीच्या पद्धतीने विभाजित झाली आहेत, अशा सामूहिक त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर, प्रशासनाकडून कार्यवाही करण्याऐवजी टाळाटाळ केली जात आहे. मतदारांना आपले नाव नेमके कोणत्या प्रभागात समाविष्ट आहे, हे ऑनलाइन / ॲपद्वारे शोधण्याची कोणतीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे मतदारांना आपले नाव शोधणे अत्यंत जिकीरीचे झाले आहे. मनपाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या पीडीएफ स्वरूपातील याद्यांमध्ये ‘सर्चिंग’ सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे मतदारांना मॅन्युअली नाव शोधावे लागत आहे. पीडीएफ याद्यांमध्ये मतदारांचे फोटो उपलब्ध नाहीत, ज्यामुळे एकाच नावाच्या दोन मतदारांबाबत अधिक गोंधळ निर्माण होत आहे. दुबार, तिबार मतदारांची प्रचंड संख्या दुबार व तिबार नोंद असलेल्या मतदारांची संख्या तब्बल एक लाखापेक्षा जास्त आहेत. तसेच आयोगामार्फत सुमारे 92 हजार दुबार नावांची यादी महापालिकेकडे देण्यात आलेली आहे. तसेच आम्ही देखील शहरांतर्गत असलेली सुमारे १२. हजार दुबार / तिबार नावे पुराव्यासह महापालिका निवडणूक विभागाकडे सादर केलेली आहे. परंतु आम्ही सादर केलेल्या आणि आपण दिलेल्या दुबार मतदारांबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रमुख मागण्या मतदारांना आपले नाव पटकन शोधता यावे, अशी व्यवस्था करावी, तसेच विशेष सहायता केंद्रे स्थापन करुन मतदार यादीतील घोळ संपवावा. हरकती दाखल करण्यासाठी मुदत वाढ द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या चुकीच्या विभाजनावर, विशेषतः पूर्ण यादी भाग किंवा वस्ती चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याच्या ठिकाणी, स्थळ पाहणी करून दुरुस्ती करण्याची कार्यवाही प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत तातडीने सुरू करावी.