शेत जमिनीची धूप वाढली; 30% जमिनीवरील उत्पादनावर होणार परिणाम – कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान

नवी दिल्ली – जमिनीची निगा न राखणे, अयोग्य पद्धतीने सिंचन करणे इत्यादी कारणामुळे देशातील शेत जमिनीपैकी 30 टक्के जमिनीवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत या जमिनीतून उत्पादन घेतले जाऊ शकणार नाही. यामुळे कृषी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती केंद्रीय कृषिमत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केली.
मृद संवर्धन या विषयावरील जागतिक परिषदेत बोलताना चौहान यांनी सांगितले की, मातीचे आरोग्य अबाधित राखण्याला आपण प्राधान्यक्रम दिला पाहिजे. तरच आपण शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करू शकू. त्याद्वारे भूक मिटविणे, पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात काम करू शकू.
सध्या भारत वर्षाला साधारणपणे 330 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करीत आहे. यातील 50 अब्ज डॉलरच्या अन्नधान्याची निर्यात केली जाते. मात्र या काही चिंता निर्माण करणार्या घटना घडत आहेत. कारण मातीचे आरोग्य वेगाने ढासळत आहे. मातीची निगा न राखणे, आवश्यकतेपेक्षा जास्त खताचा वापर किंवा असंतुलित पद्धतीने खताचा वापर, नैसर्गिक साधनसामुग्रीचा अयोग्य वापर इत्यादी कारणामुळे जमिनीची धूप होत आहे.
सरकार या क्षेत्रात सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारने 220 दशलक्ष शेतकर्यांना मातीचे आरोग्य निर्देशित करणारी कार्ड वितरित केली आहेत. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. किमान पाण्याचा वापर करून कमाल उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेचा शोध घेण्यात येत आहे. त्याबाबत शेतकर्यांना माहिती देण्यात येत आहे.
मात्र शेतकर्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शाश्वत विकास कसा होईल याची काळजी घेतली पाहिजे. जागतिक तापमानात वाढ, विषम पर्जन्यमान आणि वातावरणातील बदलामुळे आगामी काळात शेतीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यातून वैज्ञानिक पद्धतीने मार्ग काढावा लागणार आहे. तरच भारत आपल्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करू शकेल.
शेतकर्यांना तंत्रज्ञान देणार –
भारतात आणि जगात शेतीवर रचनात्मक संशोधन केले जात आहे. मात्र या संशोधनाचा फायदा भारतीय शेतकर्यांना आवश्यक त्या प्रमाणात मिळत नाही. हे ज्ञान आणि तंत्रज्ञान भारतीय शेतकर्यांना उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी नीती आयोगाचे सदस्य आणि कृषी तज्ञ रमेश चंद यांनी सांगितले.

