नोंदणी करारनाम्यावर कमी मुद्रांक शुल्क द्यावे लागणार
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
पुणे – इक्विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज (साधे गहाणखत) या दोन्हींवर आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी आता एकसारखी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
बॅंकांशी संबधित दस्तांवर मुद्रांक शुल्कामधील तफावतीमुळे होणाऱ्या मुद्रांक शुल्क चुकवेगिरीस आळा घालण्याच्या उद्देशाने बॅंकांशी संबंधित डिपॉझिट ऑफ टायटल किंवा इक्विटेबल मॉर्गेज दस्तांवर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काचा दर 0.2 टक्के ऐवजी 0.3 टक्के, तर गहाण खतामध्ये समाविष्ट असलेल्या मालमत्तेचा कब्जा दिलेला नसेल अशा साध्या गहाण खताच्या दस्तावर आकारण्यात येणारा मुद्रांक शुल्क दरदेखील 0.5 टक्के ऐवजी 0.3 टक्के असे मुद्रांक शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी तसेच अन्य असघंटीत घटकांना कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारनाम्यावर कमी मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे. गहाणखताचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी इक्विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज यांचा सर्वाधिक वापर होतो. परंतु त्यासाठी वेगवेगळी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.
इक्विटेबल मॉर्गेजसाठी सध्या 0.2 टक्के, तर सिंपल मॉर्गेजसाठी 0.3 टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. अनेकदा त्यामुळे नागरिकांना गोंधळ होतो. त्यातून वारंवार लोकांना सब रजिस्टार कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.