Eknath Shinde | Epstein files case | Prithviraj chavan : “माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच उरलेले नाही. केवळ चर्चेत राहण्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तथ्यहीन आरोप करत आहेत. हा सर्व प्रकार सूर्यावर थुंकण्यासारखा आहे,” अशा कडक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यांचा समाचार घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘एपस्टीन फाईल्स’चा हवाला देत गंभीर आरोप केले होते. “एपस्टीन हा इस्रायलचा गुप्तहेर होता आणि २०१४ मध्ये मोदींची भेट घेण्यासाठी ट्रम्प यांचा एक सल्लागार त्याच्या संपर्कात होता,” असा दावा चव्हाणांनी केला. तसेच या प्रकरणातील ईमेलमध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे नाव असल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारला धारेवर धरले होते. एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर : पृथ्वीराज चव्हाणांच्या या आरोपांना उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. शिंदे म्हणाले, जेव्हा नेते दुर्लक्षित होतात, तेव्हा सनसनाटी निर्माण करून चर्चेत राहण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. तुम्ही देशाच्या लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त करता, पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळता, ही कसली देशभक्ती? हा तर एकप्रकारे देशद्रोहच आहे. पंतप्रधान मोदी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. त्यांच्यावर जेवढे आरोप कराल, तेवढी जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. असं शिंदे म्हणाले. ‘विरोधकांना पोटदुखी आणि जळजळ’ “राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात आणि येथील नेते त्यांना साथ देतात. भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यांच्या वक्तव्यातून केवळ जळजळ दिसून येत आहे,” असा टोलाही शिंदेंनी लगावला. पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेले काम सर्वश्रुत असून, एनडीएचे सर्व घटक पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोदी आणि एपस्टीनच्या नात्यावर सरकारने खुलासा करावा : दरम्यान, चव्हाण यांनी एपस्टीन फाइल्सवर थेट सरकारला लक्ष्य करत म्हटलं की, जेफ्री एपस्टीन मोठं सेक्स रॅकेट चालवत होता आणि त्याची आत्महत्या की हत्या हे अजूनही गूढ आहे. जनतेच्या दबावामुळे अमेरिकन संसदेने एपस्टीन फाइल्स रिलीज केल्या. मोदी आणि एपस्टीनच्या नात्यावर सरकारने खुलासा करावा. फाइल्समध्ये केंद्रीय मंत्र्यांचंही नाव आलं आहे, पण सरकार खुलासा करत नाही किंवा आमचा यात संबंध नाही असंही म्हणत नाही, असा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला.