PF New Rules : EPFO ने बदलले नियम; आता तब्बल 90 टक्के रक्कम काढता येणार, तर निवृत्तीनंतर….
PF New Rules : EPFO ने पीएफमधील किमान शिल्लक मर्यादा 25% वरून 10% केली. निवृत्तीनंतर हप्त्याने पैसे काढण्याची सुविधा आणि नोकरी गेल्यानंतर दोन महिन्यांत पीएफ काढण्यास मंजुरी.

PF New Rules : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता निवृत्तीनंतर पीएफची संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी टप्प्याटप्प्याने काढता येणार आहे. यासाठी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, पीएफ खात्यात शिल्लक ठेवण्याची किमान मर्यादा 25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफमधील 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा मिळू शकते.
केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026 रोजी झालेल्या ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. याशिवाय, नोकरी गेल्यानंतर पीएफची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी 12 महिन्यांवरून पुन्हा दोन महिन्यांपर्यंत कमी करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
निवृत्तीनंतर पीएफचे पैसे हप्त्याने कसे मिळणार?
ईपीएफओने सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) या सुविधेला मंजुरी दिली आहे. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना पीएफची रक्कम एकाच वेळी काढण्याची गरज राहणार नाही. ते ठरावीक कालावधीनंतर पैसे घेऊ शकतील.
उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात निवृत्तीच्या वेळी 20 लाख रुपये जमा असतील, तर तो संपूर्ण रक्कम एकाच वेळी न काढता काही रक्कम खात्यात ठेवून उर्वरित पैशांतून नियमित हप्ते घेऊ शकेल.
विशेष म्हणजे, खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर लागू दरानुसार व्याज मिळत राहील. तसेच, गरज भासल्यास ही योजना बंद करून उर्वरित रक्कम काढण्याचाही पर्याय असेल. संबंधित खातेदाराचा हप्ते सुरू असताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला उर्वरित रक्कम काढता येईल किंवा हप्ते सुरू ठेवता येतील.
पीएफ खात्यात 10 टक्के रक्कम ठेवणे बंधनकारक –
ईपीएफओने पीएफ खात्यात किमान 25 टक्के रक्कम शिल्लक ठेवण्याची अट कमी करून 10 टक्के करण्यास मंजुरी दिली आहे. हा बदल 55 वर्षांपर्यंतच्या पात्र सदस्यांच्या अंशतः पैसे काढण्याच्या नियमांसाठी महत्त्वाचा आहे.
उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात 10 लाख रुपये जमा असतील, तर आधीच्या नियमानुसार 2.5 लाख रुपये खात्यात ठेवणे आवश्यक होते. आता नवीन निर्णयानुसार ही मर्यादा एक लाख रुपये होईल. त्यामुळे पात्रतेनुसार उर्वरित 9 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते.
मात्र, 90 टक्के रक्कम काढता येईल याचा अर्थ प्रत्येक खातेदाराला कोणत्याही कारणासाठी लगेच पैसे काढता येतील, असा नाही. त्यासाठी संबंधित नियम आणि पात्रतेच्या अटी लागू राहतील.
नोकरी गेल्यानंतर दोन महिन्यांत पीएफ काढता येणार –
नोकरी गेल्यानंतर पीएफची संपूर्ण रक्कम काढण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधी 12 महिन्यांवरून पुन्हा दोन महिन्यांपर्यंत कमी करण्यासही मंडळाने मंजुरी दिली आहे.
यापूर्वी बेरोजगार झाल्यानंतर काही अटींनुसार 75 टक्के रक्कम लगेच काढता येत होती. उर्वरित रक्कम काढण्यासाठी 12 महिने प्रतीक्षा करावी लागत होती. आता हा कालावधी कमी झाल्यामुळे नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीच्या काळात मदत मिळू शकते.
मात्र, निवृत्तीवेतन योजनेतील (EPS) पेन्शनची रक्कम काढण्यासाठीचा 36 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी कायम ठेवण्यात आला आहे.
नवीन नियम कधीपासून लागू होणार?
या निर्णयांना केंद्रीय विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली असली, तरी सर्व सुविधा लगेच सुरू होणार नाहीत. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत आवश्यक बदल आणि अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करावी लागेल.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नियमांमध्ये आवश्यक बदल झाल्यानंतर सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅनची सुविधा सुमारे दोन महिन्यांत सुरू होण्याची अपेक्षा आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीची तारीख आणि पैसे काढण्याची प्रक्रिया ईपीएफओच्या पुढील सूचनांमधून स्पष्ट होईल.




