– सुबोध रणशेवरे संपूर्ण देशभर हा पंधरवडा हरित इंधनाचा वापर आणि स्वच्छ पर्यावरण या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. ‘सक्षम’ या अभियानातून जनजागृती केली जात आहे. पारंपरिक इंधनाचे अर्थात पेट्रोल, डीझेल या सारख्या जीवाश्म इंधनाचे मर्यादित असलेले नैसर्गिक साठे, जैव इंधनाची वाढती टंचाई आणि या इंधनाच्या ज्वलनामुळे वातावरणात उत्सर्जित होणारे कार्बन मोनाक्साइडसारखे विषारी वायू आणि याच वायूमुळे प्रदूषित झालेले पर्यावरण व त्याचे मानवी जीवनावर होत असलेले दुष्परिणाम लक्षात घेऊनच सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवून प्रदूषणमुक्त स्वच्छ पर्यावरण राखण्याच्या उद्देशानेच केंद्र सरकारच्या तेल, वायू आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने जनजागृती पर सक्षम अर्थात संरक्षण क्षमता महोत्सवाचे देशव्यापी अभियान राबविले जात आहे. मानवाच्या अस्तित्वासाठी पाणी जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी इंधन हे अपरिहार्य आहे. आदिम मानवाला जेव्हा चाकाचा शोध लागला आणि त्यानंतर जेम्स वॅट सारख्या शास्त्रज्ञाने वाफेच्या शक्तीचा शोध लावला तिथूनच खर्या अर्थाने मानवी प्रगतीची नांदी झाली असं म्हणता येईल. वाफेच्या शक्तीवर इंजिन धावू लागलं आणि कोळशासारख्या इंधनाचा वापर केल्याने देखील वाहन धावू लागल्याने दळणवळणाची सुरुवात झाली. कालांतराने मग माणसाने आपल्या कुशल आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर पेट्रोल, डीझेल आणि अगदी अलीकडच्या काही दशकांमध्ये सीएनजी वायू सारख्या इंधनाचा शोध लावला. जीवाश्म इंधनामुळे दळणवळणाची क्रिया ही अधिक वेगवान बनत गेली आणि अर्थातच ही इंधनं मानवाच्या प्रगतीची गुरूकिल्ली ठरली. पेट्रोल, डीझेल किंवा सीएनजी वायू सारख्या इंधनाच्या उपलब्धतेमुळे मग विविध प्रकारच्या वाहनांची संख्या देखील प्रमाणाच्या बाहेर वाढत गेली. मात्र, नेमकी इथेच मग विविध प्रकारच्या समस्यांची देखील शृंखला सुरू झाली. आणि जीवाष्म इंधनाच्या अतिरेकी वापरामुळे पर्यावरणास हानी पोहचू लागली. नैसर्गिक पद्धतीने वर्षानुवर्षाच्या कालखंडानंतर तयार होणार्या इंधनाचे साठे देखील आता अगदी मर्यादित प्रमाणात उरलेले आहेत. रॉकेलसारखे ज्वलनशील इंधन यापूर्वी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते मात्र आता रॉकेलचे नैसर्गिक साठेच संपुष्टात येत असल्याने या इंधनाचा व्यावहारिक वापर संपलेला आहे. नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या आणि पर्यावरणास हानी पोहचविणार्या पारंपरिक इंधनाची मर्यादा आणि धोका लक्षात घेऊनच आता पारंपरिक इंधनाची सर्व स्तरावर बचत करणं आणि पर्यायी स्वच्छ नैसर्गिक इंधनाचा वापर वाढवणं ही काळाची तीव्र गरज आहे. भारत सरकारच्या तेल आणि पेट्रोलियम वायू मंत्रालयाच्या माध्यमातून संरक्षण सक्षम महोत्सवाचे अर्थात ‘सक्षम’ या देशव्यापी अभियानाचा उद्देश हा स्वच्छ पर्यावरणासाठी पर्यायी इंधनाचा वापर वाढविण्यासाठी जनजागरण हाच आहे. पारंपरिक जीवाश्म इंधनाचा वापर कमीत कमी करून पर्यायी नैसर्गिक ऊर्जेचे स्रोत हे शाश्वत स्रोत आहेत. यामध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जलऊर्जा, बायोमास, विद्युत ऊर्जा आणि हरित इंधन असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पर्यावरणाची कमीत कमी हानी आणि पूर्णपणे अपारंपरिक ऊर्जेसाठी सौर ऊर्जा हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. सोलर सेल किंवा फोटोव्होल्टाइक्सल सारख्या यंत्रणेत सिलिकॉनचा वापर केलेला असतो. सूर्यकिरण सोलर सेलवर पडून शोषून घेतलेल्या किरणांद्वारे विद्युत ऊर्जा निर्माण होते आणि वाहन याच ऊर्जेवर धावू शकतात. पाश्चिमात्य देशांमध्ये सोलर वाहनाचा वापर होऊ लागलेला आहे. आपल्याकडे देखील तो वाढवणं गरजेच आहे. इलेक्ट्रिक वाहन हा पारंपरिक इंधनासाठी एक उत्तम पर्याय आहे. आपल्याकडे आता इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढतोय ही पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. मात्र, ही विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी जर पवन ऊर्जेचा वापर वाढवला तर अक्षय आणि स्वच्छ ऊर्जा सहज मिळू शकेल. जलविद्युत टरबाइनद्वारे वीजनिर्मिती हा देखील स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेचा एक स्रोत आहे. भविष्यकाळात इंधनासाठी भूऔष्णिक ऊर्जा हा देखील एक पर्याय समोर येऊ शकतो परंतु भूऔष्णिक ऊर्जा ही स्थानिक भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असल्याने तिचा मोठ्या प्रमाणात वापर कमी होईल. एका खासगी कंपनीने हायड्रोजनवर चालणार्या कारची निर्मिती केली असून आता एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 649 किलोमीटर धावणारी अशी कार इंधन बचतीसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध झालेला आहे. ही कार प्रदूषणमुक्त असून हायड्रोजनसारख्या स्वच्छ इंधनावर चालणारी आहे. जीवाश्म इंधनाचा वापर करताना दैनंदिन व्यवहारात काही छोट्या छोट्या गोष्टींमधून देखील आपण इंधनाची बचत करू शकतो. सिग्नल जवळ वाहन थांबले की गाडी बंद करणे, प्रवासासाठी बस, रेल्वे, मेट्रो, मोनो असा सार्वजनिक वाहनाचाच वापर करणे, जवळच्या अंतरासाठी सायकलसारख्या प्रदूषणमुक्त वाहनाचा वापर करणे, घरगुती सिलेंडरमध्ये मिथेन वायूचा वापर केलेला असतो. घरगुती स्वरूपात अन्न शिजवण्यासाठी कूकरचा वापर करणे, अगदी पावसाळा वगळता अन्न शिजविण्यासाठी सोलर चुलीचा वापर करणे, गॅसवर स्वयंपाक करताना उगीचच इतर व्यवधानात अडकून गॅस वाया न जाऊ देणे अशा छोट्या गोष्टींतून इंधनाची फार मोठी बचत करू शकता. कमीत कमी वायू प्रदूषण होईल अशा प्रकारची अद्ययावत यंत्रणा वाहनामध्ये बसवलेली दिसते. अशा आधुनिक वाहनाचा वापर करून देखील आपण पर्यावरणाच्या रक्षणात हातभार लावू शकतो. देशभरातील वाहनचालकांचे समुपदेशन करणे आणि त्यासाठीच विविध कार्यशाळा, प्रात्यक्षिक, पर्यायी इंधनासाठी प्रोत्साहनपर योजना देखील शासनाने राबवायला हव्यात.