प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीच्या सुरळीततेसाठी पोलीस विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील ६२ प्रमुख मार्गांवर सकाळी व सायंकाळी ठरावीक वेळेत सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. काही ठिकाणी ही बंदी पूर्णवेळ असून, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यामध्ये सवलत देण्यात आली आहे.वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, तळवडे, निगडी, चिंचवड, भोसरी, हिंजवडी, सांगवी, वाकड, पिंपरी, देहूरोड, महाळुंगे, चाकण, दिघी-आळंदी आणि तळेगाव या वाहतूक विभागांमध्ये हे निर्बंध लागू आहेत. सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ९ या वेळेत बहुतेक मार्गांवर ही बंदी राहील, तर काही मार्गांवर ७ ते १० वाजेपर्यंत किंवा पूर्ण वेळ बंदी लागू आहे. वाहतूक पोलीस उपआयुक्त विवेक पाटील यांच्या आदेशानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी नवीन नियमानुसार वाहतूक नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.