Dhananjay Munde | Walmik Karad – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे अनेक कारनामे आणि प्रकरणे उघडकीस येत आहे. आता वाल्मिक कराडचे प्रकरण अखेर मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. उच्च न्यायालयामध्ये वाल्मिक कराडविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी थेट नाव आल्याने धनंजय मुंडेंच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ‘आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांच्याकडून धनंजय मुंडेंविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडेंविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ईडी प्रतिवादी असून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनेक शेल कंपन्या असून, खंडणीची रक्कम या कंपन्यांमध्ये वळती केल्याचा गंभीर आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाची ईडीकडून समांतर तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांनी व्यवहार मंत्रालयाकडून मिळवलेल्या कागदपत्रानुसार मुंडे आणि कराड एकाच खासगी कंपनीत सहसंचालक आहेत. धनंजय मुंडे यांच्या खासगी संस्थेत वाल्मीक कराड हे सहसंचालक आहे. याबाबत लेखापरीक्षकांकडून रजिस्टर कॉपी मिळवली असल्याचा तिरोडकर यांचा दावा आहे. तसेच धनंजय मुंडे संस्थापक/संचालक असलेल्या जगमित्र साखर कारखाना, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कराड सहसंचालक असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच एसआयटी वाल्मीक कराडने केलेल्या गुन्ह्यांचा तपास करत आहे. मात्र, हा तपास जेव्हा कॅबिनेट मंत्र्यांच्या दारापर्यंत येतो तेव्हा तपास थांबविला जातो, असेही याचिकेत म्हटले आहे. तसेच व्यंकटेश्वर इंडस्ट्रियलच्या कार्यालयात वाल्मिक कराडचे बेकायदा धंदे सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता या याचिकेवर न्यायालय काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.