पुणे –दिवाळीच्या आनंदाला तोटा नसला तरी यंदा करोना, लॉकडाऊन यामुळे समाजातील काही घटकांच्या मनातील उत्साह मात्र दरवर्षी इतका पहायला मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या “पुनीत बालन स्टुडिओज’ने “आशेची रोषणाई’ या सामाजिक संदेश देणाऱ्या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. बॉलिवूडमधील सिनेमॅटोग्राफर महेश लिमये, संगीतकार अजय-अतुल, महाराष्ट्राची लाडकी जोडी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख ही मंडळी या मराठी शॉर्टफिल्मसाठी पहिल्यांदाच एकत्र आली आहेत.
या विषयी शॉर्टफिल्मचे दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी माहिती दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी लॉकडाऊनमुळे अनेक घटकांना आर्थिक फटका बसला आहे, त्या घटकांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद पसरवूया अशी संकल्पना निर्माते पुनीत बालन यांनी मांडली. यातून “आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्मची निर्मिती झाली, असे लिमये म्हणाले.
या शॉर्टफिल्मची संकल्पना ऐकता क्षणी अभिनेता रितेश देशमुख आणि संगीतकार अजय-अतुल यांनी होकार दिला. बालन यांची संकल्पना लेखक क्षितिज पटवर्धन याने त्याच्या लेखणीतून उत्तम उतरवली आहे. संगीतकार अजय-अतुल यांनी अतिशय कमी वेळेत पार्श्वसंगीताचा साज “आशेची रोषणाई’ला चढवला आहे तर रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी कल्पकतेने ते मांडले आहे.
“पुनीत बालन स्टुडिओज’ची ही सामाजिक संदेश देणारी सलग तिसरी निर्मिती आहे. या शॉर्टफिल्मला ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांचा व्हॉइस ओव्हर लाभला आहे. ही शॉर्टफिल्म “पुनीत बालन स्टुडिओज’च्या युट्यूब चॅनल, फेसबुक, इन्स्टाग्राम पेजवर विनामूल्य उपलब्ध आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही निर्मिती केलेल्या दोन्ही शॉर्टफिल्मला जगभरातील गणेशभक्तांची दाद मिळाली. अनलॉक प्रक्रिया सुरू असली, तरी सर्व व्यवहार पूर्ववत झाले नाहीत. आम्ही प्रशासनाच्या मदतीने हजारो लोकांपर्यंत विविध स्वरुपात मदत पोहोचवली आहे. अजूनही अनेक लोकांना मदतीची आवश्यकता आहे, अशा गरजू लोकांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा आमचा हेतु आहे. “आशेची रोषणाई’ बघून नागरिक आपल्या जवळपासच्या गरजूंना छोटीशी मदत करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास वाटतो.
– पुनीत बालन, उद्योजक तथा निर्माते