Pimpri : पावसात गरमागरम भजींचा आस्वाद

कामशेत : रिमझिम पावसात निसर्गसौंदर्याचा आनंद घेत गरमागरम भजी आणि चहा यांची मजा लुटण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. आषाढ-श्रावण महिन्याच्या आगमनासोबत कामशेत परिसर हे ‘भजी-चहा पर्यटनस्थळ’ बनत चालले आहे. डोंगरदऱ्या, धबधबे, हिरवळ, आणि धुक्याच्या साक्षीने भटकंती करणाऱ्या पर्यटकांसाठी आता भज्यांचा स्वाद ‘हायलाइट’ ठरतोय.
कामशेतसह मावळ तालुक्यातील आसपासच्या डोंगराळ भागांत पर्यटनाचा ओघ वाढला आहे. स्थानिकांच्या घरोघरी पावसाळी पदार्थांचे आयोजन सुरू आहे. कांदा, बटाटा, मिरची, वांगी, ओव्याची पाने यांची कुरकुरीत भजी आणि गरम चहा यांचा आस्वाद पर्यटक घेत आहेत. काहीजण खास भजीपार्टीसाठी डोंगरकाठच्या जागा निवडून पिकनिकचा आनंद घेतात. डाळीच्या पिठात मिसळलेली तिखट-मीठाची चव आणि साजूक तुपात तळलेली भजी ही चव मनात दीर्घकाळ राहते.
स्थानिकांना रोजगाराचा आधार
याशिवाय पावसाळी दिवसांत मक्याच्या पदार्थांना देखील विशेष मागणी आहे. भाजलेले कणीस, मक्याची भजी, पॅटीस, कटलेट हे पदार्थ रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्यांपासून ते स्थानिक घरांमध्ये उत्साहात तयार केले जात आहेत. पर्यटकांसाठी हे पदार्थ आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. याशिवाय स्थानिकांना रोजगाराचाही आधार मिळतो आहे.
‘फळांचे फ्रिटर्स’ही लोकप्रिय
एक हटके खाद्यसंस्कृती म्हणून ‘फळांचे फ्रिटर्स’ सुद्धा लोकप्रिय होत आहेत. सफरचंद, केळी, अननस यांसारख्या फळांचे गोडसर भजीसदृश पदार्थ मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडत आहेत. यासाठी मैद्याऐवजी इतर पिठांचा वापर करून आरोग्यदृष्ट्याही हे पर्याय योग्य मानले जात आहेत.
हेल्दी मोमोजही उपलब्ध
मोमोजप्रेमींनाही कामशेतने निराश केलेले नाही. स्टीम मोमोज, विशेषतः केळीच्या पानांवर वाफवलेले हेल्दी मोमोज, शेजवान किंवा सॉससोबत खाण्याचा ट्रेंड पावसात अधिक रंगतो आहे.
निसर्गाचा आनंद अन् चविष्ट खाद्यसंस्कृती
तुंग, टिकोना, थळेवाडी, पवना धरण परिसरात भटकंती करणाऱ्यांसाठी गरमागरम भजी, चहा, मका व फळांचे फ्रिटर्स ही जणू पावसातली पर्वणीच ठरत आहे. निसर्गाचा आनंद आणि चविष्ट खाद्यसंस्कृती यांचा मेळ पर्यटकांना अनुभवता येतो आहे. त्यामुळे कामशेत हे ‘स्वादिष्ट’ पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येताना दिसते आहे.





