#ENGvWI 2nd Test : क्रेग बर्थव्हाइटने विंडिजला सावरले

मॅंचेस्टर – क्रेग बर्थव्हाइट याने संयमी फलंदाजी करत वेस्ट इंडिजचा डाव सावरला. चौथ्या दिवशी चहापानाला खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या डावात 3 गडी गमावून 151 धावा केल्या आहेत. ते अद्याप 318 धावींनी पिछाडीवर आहेत. 

इंग्लंडने पहिला डाव 9 बाद 469 धावांवर घोषित केल्यावर वेस्ट इंडिजची पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेर 1 बाद 32 अशी स्थिती झाली होती. त्यावेळी पावसाने एन्ट्री घेत सामन्यात व्यत्यय निर्माण केला. ढगाळ वातावरणात वेस्ट इंडिजच्या फलंदाजीवर वर्चस्व राखण्याची इंग्लंडच्या गोलंदाजांना संधी होती. मात्र संततधार पाऊस कायम राहिला व त्यामुळे तिसरा संपूर्ण दिवस खेळ होऊ शकला नाही. रविवारी चौथ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर वेस्ट इंडिजने आपला पहिला डाव पुढे सुरू केल्यावर सावध व संयमी फलंदाजी केली.

जॉन कॅम्पबेल लवकर परतल्यानंतर अल्झारी जोसेफने बर्थव्हाइटसोबत अर्धशतकी भागीदारी केली मात्र, स्थिरावल्यानंतरही तो मोठी खेळी करू शकला नाही. तो बाद झाल्यावर शाय होपने बर्थव्हाइटला सुरेख साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. ही जोडी स्थिरावली असे वाटत असतानाच होप बाद झाला.

यावेळी वेस्ट इंडिजच्या 3 बाद 123 धावा झाल्या होत्या. या जोडीनेही अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान बर्थव्हाइटने आपले अर्धशतक पूर्ण केले. रविवारी सामन्याचा चौथा दिवस होता, त्यामुळे हा सामना अनिर्णित राहणार असल्याचे दिसत असले तरीही वेस्ट इंडिजने बळी लवकर गमावले तरच इंग्लंडला सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याची संधी मिळू शकेल.

चेंडू केला सॅनिटाइज

डॉमनिक सिबलीने वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना चेंडू चमकवण्यासाठी अनावधानाने चेंडूला लाळ लावली. मात्र, आपल्या हातून नियमाचा भंग झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने लगेचच पंचांना याबाबत माहिती दिली. पंचांनीही हा चेंडू त्याचक्षणी सॅनिटाइज केला व काही वेळातच सामना सुरू झाला. पंचांनी त्याच्यावर कारवाई केली नाही. मात्र, पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या जेम्स अंडरसनने अशीच चूक केली होती, त्यावर आयसीसीने अद्याप कारवाई करण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड पहिला डाव – 9 बाद 469 घोषित. वेस्ट इंडिज पहिला डाव – 52 षटकांत 3 बाद 151. (क्रेग बर्थव्हाइट खेळत आहे 60, शेमार ब्रुक्‍स खेळत आहे 14, सॅम कुरेन 2-32).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.