#ENGvIND 3rd Test : आजपासून हेडिंग्लेवर रंगणार तिसरी कसोटी

लिड्स – लॉर्डस कसोटी जिंकून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाची बाजू यजमान इंग्लंडविरुद्ध वरचढ होत आहे. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर लॉर्डसवर विजय मिळवत भारतीय संघ मालिका विजयासाठी सज्ज बनला आहे. मात्र, त्यासाठी आता हेडिंग्ले कसोटी जिंकून ही मालिका सुरक्षित करण्याचीही भारतीय संघाला संधी आहे.
नॉटिंगहॅम कसोटीत भारतीय संघ जिंकण्यापासून पावसामुळे वंचित राहिला होता. मात्र, त्यानंतर बिकट परिस्थितीवर मात करत भारतीय संघाने लॉर्डस कसोटी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता हेडिंग्ले कसोटी जिंकून या मालिकेत भारतीय संघ मालिका सुरक्षित करण्यासाठी सज्ज आहे. या मैदानावर भारतीय संघाने आजवर एकही कसोटी गमावली नाही. भारतीय संघाला प्रमुख फलंदाजांची सर्वांत मोठी चिंता लागली आहे.
सलामीवीर लोकेश राहुलचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने मोठी खेळी केलेली नाही. रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांनी साफ निराशा केली आहे. लॉर्डसवर रहाणेने अर्धशतक फटकावले. मात्र, त्याला संघाला मोठी धावसंख्या उभारून देता आली नाही. पुजाराने पन्नाशीच्या जवळ येत मोठ्या खेळीची चाहूल दाखवली. मात्र, तोदेखील बाद झाला. कर्णधार कोहलीचा सूर हरवलेलाच असून, त्याला धावांची चाळीशी पार करण्यातही अपयश येत आहे. ऋषभ पंत, रवींद्र जडेजा यांनी उपयुक्त फलंदाजी करत संघाचा डाव सावरला आहे. मात्र, त्यांच्या कामगिरीतही सातत्य नसल्याने या कसोटीसाठी संघात जडेजाच्या जागी रवीचंद्रन अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. पुजारालादेखील संघातून वगळण्यात येणार असल्याचे संकेत असून, त्याच्या जागी सूर्यकुमार यादवचा समावेश होण्याची चिन्हे आहेत.
गोलंदाजीत महंमद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा व महंमद सिराज यांचे संघातील स्थान कायम राहणार असून, केवळ जडेजाच्या जागी अश्विन हा एकमेव बदल होणार आहे. इंग्लंड संघात डेव्हिड मलान याची निवड करण्यात आल्यामुळे कर्णधार ज्यो रूटसह त्यांच्या फलंदाजीला काही प्रमाणात बळकटी येणार आहे. त्यांचे नावाजलेले फलंदाज सातत्याने अपयशी ठरत असताना त्यांची तळातील फलंदाजीही सशक्त नसल्यामुळे त्यांना पहिल्या दोन्ही कसोटीत मोठी धावसंख्या उभारण्यात तसेच भारतीय संघावर दडपण राखण्यात अपयश आले. आता तिसरी कसोटी सुरू झाल्यावर भारतीय फलंदाज यशस्वी होणार का आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोहलीसह सर्व प्रमुख खेळाडूंना सूर गवसणार का हे महत्त्वाचे
ठरणार आहे.
अश्विन निर्णायक ठरेल
रवींद्र जडेजा याच्या जागी रवीचंद्रन अश्विन याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंडच्या संघात डावखुरे फलंदाज जास्त असल्याने अश्विनची ऑफस्पीन गोलंदाजी त्यांच्यासाठी धोकादायक ठरेल, तर दुसरीकडे अश्विनची फलंदाजी भारतीय संघासाठी पूरक ठरेल. जुन्या चेंडूवरच नव्हे तर नव्या चेंडूवरही अश्विन अचूक गोलंदाजी करू शकतो, त्यामुळे या कसोटीसाठी त्यालाच खेळवण्याचे धोरण कर्णधार विराट कोहली ठेवेल, अशी शक्यता आहे.





