#ENGvIND 2nd ODI : यजुवेंद्र चहलची अनोख्या कामगिरीला गवसणी

लंडन – भारताचा लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एका अनोख्या कामगिरीला गवसणी घातली. इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 4 बळी घेण्याचा विक्रम त्याने साकार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना लॉर्डस मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला तब्बल 100 धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, या पराभवातही चहलने ही कामगिरी केली.
यापूर्वी 1983 साली झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम लढतीत भारताच्या मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 26 धावांत 3 बळी घेतले होते. तसेच याच मैदानावर आशिष नेहराने 2004 साली इंग्लंडविरुद्ध 26 धावांत 3 बळी घेतले होते. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहलने 10 षटकात 47 धावा देत 4 बळी घेत ही कामगिरी आपल्या नावावर केली.





