वर्ल्डकप सुपर लीग : दुसऱ्या सामन्यात भारताला पराभूत करुन इंग्लडची पहिल्या स्थानी झेप, भारत ‘या’ स्थानावर

नवी दिल्ली – सध्या इंग्लडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लड यांच्यात कसोटी व टी-२०मालिका पार पडली आहे. त्याचबरोबर या दोन संघात आता वनडे मालिका खेळली जात आहे. ही मालिका आयसीसीच्या वर्ल्डकप सुपर लीगचा भाग आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक सामन्यातील विजय आणि पराभव महत्वाचे आहेत. यामुळे दोन्ही संघाच्या गुणांत बदल होणार आहे.
भारत आणि इंग्लड संघात शुक्रवारी वनडे मालिकेतील दुसरा सामना पुणे येथे पार पडला. या सामन्यात इंग्लडने ४३.३ षटकांत भारताने दिलेले लक्ष्य ४ गड्यांच्या मोबदल्यात पुर्ण केले. त्यामुळे इंग्लडला मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने आयसीसीच्या वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतालिकेत फायदा झाला आहे. म्हणून इंग्लडने वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
आयसीसीच्या वर्ल्डकप सुपर लीगचा प्रारंभ जुलै २०२० मध्ये झाला आहे. या लीगमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा असणाऱ्या १३ संघांचा सहभाग आहे. या लीगच्या आंतर्गत प्रत्येक संघाला तीन वनडे सामन्यांच्या आठ मालिका खेळायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक संघाला या लीगच्या अंतर्गत २४ वनडे सामने खेळावे लागणार आहेत. या आठ मालिकेतील चार मलिका घरच्या मैदानावर आणि चार मालिका बाहेरील मैदानावर खेळावे लागतील.
भारत आणि इंग्लड संघात दुसरा वनडे सामना झाल्यानंतर आयसीसीच्या वर्ल्ड सुपर लीगच्या गुणतालिकेत बदल झाले आहेत. या गुणतालिकेत इंग्लड अव्वलस्थानी विराजमान आहे. इंग्लडने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४ सामन्यांत विजय आणि ४ सामन्यांत पराभव झाला आहे. त्यामुळे इंग्लडच्या खात्यात ४० गुण आणि ०.५३८ नेट रन रेट आहे. त्याचबरोबर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगणिस्तान आणि बांग्लादेश हे देश आहेत.
भारताने या लीगच्या अंतर्गत आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. त्यापैकी २ जिंकले आणि ३ गमावले आहेत. त्यामुळे भारताच्या खात्यात १९ गुण आणि -०.१९० नेट रन रेट आहे. म्हणून भारताचा टॉप ५ मध्ये सहभाग नाही. त्यामुळे भारत सद्या नवव्या क्रमांकावर आहे.




