चारदिवसीय कसोटीस इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा

दुबई : जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढावी तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचा व्यग्र कार्यक्रम अधिक सोयीचा व सूकर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) पाच दिवसांच्या कसोटी सामन्याचा एक दिवस कमी करत चार दिवसांचा सामना करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
२०२३ च्या मोसमापासून हा बदल अनिवार्य करण्याचा विचार सुरू असल्याचे कळते, असे असतानाच आता या संकल्पनेला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) पाठिंबा दर्शविला आहे.
कसोटी सामने ४ दिवसांचे झाल्यामुळे सध्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक आणि खेळाडूंवरील ताण यावर काहीतरी मार्ग निघू शकतो, असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्यांनी एका माध्यमास सांगितले आहे.
हा बदल २०२३ ते २०३१ या कालावधीसाठी असेल. जर हा प्रयोग यशस्वी ठरला आणि त्यात यश आले, तर कसोटी सामना चार दिवसांचाच राहिल. कसोटी सामने ४ दिवस केले तर एका दिवसात ९० ऐवजी ९८ षटके टाकली जातील.
अनिर्णित राहणारे कसोटी सामन्यांच्या दिवसांची संख्या पाच दिवस करूनही बरेच सामने निकाली निघत नाहीत. दुसरीकडे काही सामने तर तीन दिवसांतच संपतात. त्यामुळे कसोटीला गतवैभव मिळावे यासाठी आयसीसीने हे पाऊल उचलले आहे. नव्या वर्षात आयसीसी कसोटी खेळणा-या सर्व देशांच्या क्रिकेट मंडळांना बैठकीचे निमत्रंण देणार असून त्यानंतरच या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.





