अभियंता दिन विशेष

देशभर 15 सप्टेंबर हा दिवस “अभियंता दिवस’ (इंजिनिअर्स डे) म्हणून साजरा केला जातो. भारतातील पहिले अभियंता सर मोक्षगुडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेले विश्वेश्‍वरय्या केवळ अभियंता नव्हते तर कट्टर व थोर देशभक्तही होते.
जयंतीनिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा अल्पसा आढावा…

कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मदनहळ्ळी या अतिदुर्गम खेड्यात 1861 साली 15 सप्टेंबरला या श्रेष्ठ अभियंत्याचा जन्म झाला. अत्यंत कठीण असलेली इंजिनिअरिंगची अंतिम परीक्षा त्यांनी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केली व या देशातील पहिले अभियंता (इंजिनिअर) बनण्याचा बहुमान मिळवला. वयाच्या पंधराव्या वर्षी वडिलांचे निधन झालेले. घरात आठराविश्व दारिद्य्र. शिक्षणास पैसा नाही. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ आईच्या उत्तम संस्काराने स्वतःच्या विद्वत्तेवर शिष्यवृत्ती मिळवून बंगळूर येथे प्रारंभीचे शिक्षण विश्वेश्‍वरय्या यांनी पूर्ण केले.

वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी त्यांच्या बुद्धिमत्तेतील स्थापत्य विषयातील नैपुण्य लक्षात घेऊन त्यांना तत्कालिन मुंबई इलाख्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती देण्यात आली. त्याचबरोबर 1904 साली त्यांना बढती मिळून संपूर्ण देशाचे पहिले अभियंता होण्याचा बहुमान मिळाला. त्यावेळेपर्यंत या पदावर इंग्रज लोकच अभियंता म्हणून काम करत होते. विश्वेश्‍वरय्या यांना बहुमान मिळाल्याने त्यांचे संपूर्ण देशातून कौतुक झाले.

आपल्या नोकरीच्या कार्यकाळात विश्वेश्‍वरय्या यांनी ठिकठिकाणी 24 वर्षे नोकरी केली. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. म्हैसूर संस्थानचे मुख्य अभियंता म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्याकाळात त्यांनी कृष्णराज सागर हे कावेरी नदीवरील धरणाचे काम पूर्ण केले. त्यांना या कामाचे पारितोषिक म्हणून गौरवार्थ म्हैसूर संस्थानचे दिवानपद त्यांना बहाल करण्यात आले.

मुळात प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेल्या विश्वेश्‍वरय्या यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजातील घटकांसाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. त्यावेळची शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच वेगळी होती. आजच्यासारखे शेतकरी शिक्षीत नव्हते. त्यांना शेतीचे ज्ञान व्हावे म्हणून म्हैसूर विद्यापीठाची स्थापना विश्वेश्‍वरय्या यांनीच केली. भद्रावती येथील अवाढव्य लोखंड व पोलाद कारखाना हे तर त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे जिवंत प्रतिक आहेत. खरे म्हणजे आज देशात दिसून येणाऱ्या औद्योगिकी करणाच्या प्रगतीचा मुहूर्तमेढ विश्वेश्‍वरय्या यांनी रोवली, असे म्हणायला हवे. त्यांनी देशाच्या वैभवात भर घालणारी अनेक कामे केली.

सेवानिवृतीनंतर देशभरातील विविध संस्थांवर विविध पदांवर राहून चाळीस वर्षे अखंड काम केले. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा होती. त्या वयातही ते ज्या ऊर्जेने काम करीत होते ते आजच्या तरूणांना लाजविणारे आहे. विश्वेश्‍वरय्या यांनी त्याकाळी एडन शहराच्या पाणीपुरवठा व जलनि:सारणाच्या योजना राबवून इंग्रज अभियंत्यांना आश्‍चर्यचकित केले होते. सिंचन क्षेत्रातील ब्लॉक सिस्टीमचा पाया सुद्धा विश्वेश्‍वरय्या यांनी घालून दिला होता. महाराष्ट्रातील खडकवासला धरणातील स्वयंचलित दरवाजे ही त्यांचीच देणगी आहे.

विश्वेश्‍वरय्या यांची राहणी अगदी साधी होती. म्हैसुरी पद्धतीचा फेटा व साधी वेशभूषा त्यांनी शेवटपर्यंत जपली. त्यांचे व्यक्‍तिमत्त्वही आकर्षित होते. त्यांच्यापुढे बोलण्याचे धाडस कोणामध्ये होत नव्हते. ते जितके साध्या स्वभावाचे होते तितकेच ते काही बाबतीत परखडही होते. विश्वेश्‍वरय्या यांना अंधश्रद्धा मान्य नव्हती. मानवात देव आहे व मानवाची सेवा हिच ईश्वरसेवा आहे, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. ते जसे बोलत होते त्याच पद्धतीने ते वागतही होते.

वयाच्या 94 व्या वर्षी भारतरत्न या परमोच्च किताबाने देशाने या अभियंत्याचा गौरव केला. विश्वेश्‍वरय्या शतायुषी होऊन निरामय जीवन जगले. 14 एप्रिल 1962 ला त्यांनी वयाच्या 101 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आजही संपूर्ण देशभर केला जातोय.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)