ENG vs WI 1st Test : बेन स्टोक्सच्या नावे खास विक्रमाची नोंद, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील तिसरा खेळाडू…

ENG vs WI 1st Test (Ben Stokes) : वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने एक विशेष कामगिरी केली आहे. कसोटीत 6,000 धावा आणि 200 बळी घेणारा स्टोक्स जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे.
स्टोक्स व्यतिरिक्त फक्त सर गारफिल्ड सोबर्स आणि जॅक कॅलिस यांनी ही कामगिरी केली होती. ही कामगिरी करणारा स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला खेळाडू आहे. सोबर्सने 93 कसोटी खेळल्या आणि 8032 धावा आणि 235 विकेट घेतल्या आहेत.
The skipper enters a VERY exclusive club 👏 @benstokes38 pic.twitter.com/2xUgh7VqzX
— England Cricket (@englandcricket) July 11, 2024
दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने आपल्या कारकिर्दीत 166 कसोटी सामने खेळले आणि 13 हजार 289 धावा आणि 292 विकेटही आपल्या नावावर केल्या आहेत. स्टोक्सने आपल्या 103व्या कसोटी सामन्यात हा पराक्रम नोंदवला. त्याच्या नावावर सध्या 6 हजार 320 धावा आणि 201 विकेट आहेत.
मॅकेन्झीला बाद करून या यादीत झाला सामील…
स्टोक्सने त्याच्या पहिल्याच षटकात किर्क मॅकेन्झीला बाद करून हा पराक्रम नोंदवला. मॅकेन्झी शून्यावर बाद झाला. यासह स्टोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा आणि 300 विकेट्स पूर्ण करणारा सहावा खेळाडू ठरला आहे. या यादीत त्याच्या आधी कार्ल हूपर, सनथ जयसूर्या, जॅक कॅलिस, शाहिद आफ्रिदी आणि शकीब अल हसन यांचा समावेश आहे.





