ENG vs SL 2nd Test : जो रुटचा धडाका सुरुच…! लॉर्ड्सवर सलग दुसरं अन् ऐतिहासिक शतक लगावताना रचली अनेक विक्रमांची मालिका….

ENG vs SL 2nd Test (Joe Root 34th Century) : इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने शनिवारी श्रीलंकेविरुद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक झळकावले. यासह तो इंग्लंडकडून सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. रूटने इंग्लंडचा महान ॲलिस्टर कुकचा विक्रम मोडला. कुकने इंग्लंडकडून 33 कसोटी शतके झळकावली आहेत. जो रूटच्या या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेसमोर 483 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. रुटने लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावली आहेत. येथे आम्ही तुम्हाला रुटने आपल्या 34व्या कसोटी शतकादरम्यान केलेल्या विक्रमांबद्दल सांगणार आहोत.
1. लॉर्ड्सवर दोन्ही डावात शतके ठोकणारा फलंदाज : लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा जो रूट हा चौथा फलंदाज ठरला आहे. त्यांच्या आधी जॉर्ज हॅडलीने 1939 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 106, 107 धावा केल्या होत्या. दुसऱ्या स्थानावर ग्रॅहम गूच असून त्याने 1990 मध्ये भारताविरुद्ध 333 आणि 123 धावा केल्या होत्या. मायकेल वॉनने 2004 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 103 आणि 101 धावा केल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर जो रूट आहे, ज्याने 143 आणि नाबाद 103 धावा केल्या आहेत.
1. जॉर्ज हॅडली 106 आणि 107 विरुद्ध वेस्ट इंडिज, 1939
2. ग्रॅहम गूच 333 आणि 123 विरुद्ध भारत, 1990
3. मायकेल वॉन 103 आणि 101* वि वेस्ट इंडीज, 2004
4. जो रूट 143 आणि 103 विरुद्ध श्रीलंका, 2024
2. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक शतके : श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने नऊ शतके झळकावली आहेत. युनूस खान दुसऱ्या स्थानावर असून त्याने आठ शतके झळकावली आहेत. अझहर अली आणि जो रूट यांनी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत प्रत्येकी 6 शतके झळकावली असून दोघेही संयुक्त तिसऱ्या स्थानावर आहेत.
3. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त शतके : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 100 शतके ठोकली आहेत. विराट कोहलीने 80 आणि रिकी पाँटिंगने 71 शतके झळकावली आहेत. जो रूटने कसोटीतील 34वे शतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 50 शतके पूर्ण केली. 50 किंवा त्याहून अधिक शतके करणारा तो नववा फलंदाज ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक शतके झळकावणारे फलंदाज…
100 – सचिन तेंडुलकर
80 – विराट कोहली
71 – रिकी पाँटिंग
63 – कुमार संगकारा
62 – जॅक कॅलिस
55 – हाशिम आमला
54 – महेला जयवर्धने
53 – ब्रायन लारा
50 – जो रूट
A Test match to remember for Joe Root ❤️ pic.twitter.com/LeqN7bXT3p
— England Cricket (@englandcricket) August 31, 2024
4. लॉर्ड्सवर सर्वाधिक शतके : जो रूट लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. रूटने शनिवारी लॉर्ड्सवर सातवे कसोटी शतक झळकावले. ग्रॅहम गूच आणि मायकेल वॉन यांनी लॉर्ड्सवर प्रत्येकी 6 शतके झळकावली आहेत. या सामन्यात रूटने दोन शतके झळकावली.
5. इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके : स्टार फलंदाज जो रूट इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे. जो रूटने शनिवारी कारकिर्दीतील 34 वे शतक झळकावले. त्याने 33 शतके झळकावणाऱ्या ॲलिस्टर कूकला मागे टाकले. केविन पीटरसन 23 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
6. रुटची सुनील गावस्करांशी बरोबरी : कसोटीत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत रुटने आता सुनील गावस्कर, महेला जयवर्धने, ब्रायन लारा आणि युनूस खान यांची बरोबरी केली आहे.
कसोटीत सर्वाधिक शतके
51 – सचिन तेंडुलकर
45 – जॅक कॅलिस
41 – रिकी पाँटिंग
३८ – कुमार संगकारा
36 – राहुल द्रविड
34 – जो रूट
34 – सुनील गावस्कर
34 – महेला जयवर्धने
34 – ब्रायन लारा
34 – युनूस खान
7. लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज : या शतकामुळे जो रूट लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. रूटने ग्रॅहम गूचचा 30 वर्ष जुना विक्रम मोडला. रुटच्या आता लॉर्ड्सवर 40 डावात 2022 धावा झाल्या आहेत. तर गूचने या मैदानावर 39 डावात 2015 धावा केल्या होत्या.




