ENG vs PAK 1st Test (Day 4) : ब्रूकचे तिहेरी तर रूटचे द्विशतक, इंग्लंडचा पहिला डाव 7 बाद 823 धावांवर घोषित…

ENG vs PAK 1st Test (Day 3) : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. हा सामना मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 101 षटकांत 5 गडी गमावून 491 धावा केल्या होत्या. आज पुढे खेळताना इंग्लंड संघानं 150 षटकांत 7 विकेट गमावून 823 धावा करून पहिला डाव घोषित केला आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 556 धावा केल्या होत्या. यासह पाहुण्या संघानेही पहिल्या डावात 268 धावांची मोठी आघाडी घेतली आहे.
ब्रूकचे तिहेरी तर रूटचे द्विशतक…
इंग्लंडची सात बाद 823 धावा ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच इंग्लंड कसोटी क्रिकेटमध्ये तीन वेळा 800 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला संघ ठरला आहे. यादरम्यान इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 322 चेंडूत 29 चौकार अन् 3 षटकारासह सर्वाधिक 317 धावांची खेळी केली. यासह ब्रूक इंग्लंडकडून कसोटीत त्रिशतक झळकावणारा सहावा फलंदाज ठरला. तसेच पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला.
England declare with a 267-run lead!
The fourth-highest total in Test history 🤩https://t.co/jamBKcZQ6G | #PAKvENG pic.twitter.com/A7IFlLEMGx
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 10, 2024
जो रूटने देखील दुहेरी शतक लगावले. त्यानं 375 चेंडूत 17 चौकारासह 262 धावा केल्या. याव्यतिरिक्त जॅक क्रॉलीने 85 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 78 धावांची तर बेन डकेटने 75 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 84 धावांची खेळी केली. यादरम्यान पाकिस्तानकडून पहिल्या डावात नसीम शाह आणि सॅम अयुबने प्रत्येकी 2 बळी घेतले. तर शाहीन शाह आफ्रिदी ,आमेर जमाल आणि आगा सलमानने प्रत्येकी 1 बळी घेतला.
पाकिस्ताच्या गोलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम….
पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या गोलंदाजांच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला. या सामन्यात पाकिस्तानकडून 7 खेळाडूंनी गोलंदाजी केली. यापैकी 6 जणांनी 100 किंवा त्याहून अधिक धावा दिल्या. आतापर्यंत, कसोटी क्रिकेटमध्ये असे एकदाच घडले आहे, जेव्हा संघाच्या 6 गोलंदाजांनी 100 किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत. यापूर्वी असा नकोसा विक्रम झिम्बाब्वेच्या गोलंदाजांच्या नावावर होता, जेव्हा 2004 मध्ये बुलावायो येथे त्यांच्या 6 गोलंदाजांनी 100 किंवा त्याहून अधिक धावा दिल्या होत्या.
पाकचा पहिला डाव 556 वर संपुष्टात…
दरम्यान, दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा पहिला डाव 149 षटकांत 556 धावांवर आटोपला होता. यादरम्यान पहिल्या डावात पाकिस्तानकडून 8व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आघा सलमानने शतक झळकावले, तर त्याच्याआधी कर्णधार शान मसूद आणि सलामीवीर फलंदाज अब्दुल्ला शफीक यांनीही शतके झळकावली होती. सलमान आघाने 119 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी खेळली. तर कर्णधार शान मसूदने 151 तर अब्दुल्ला शफीकने 102 धावा केल्या. या सामन्यात बाबर आझमची बॅट चालली नाही आणि त्याने 81 चेंडूत 33 धावांची खेळी केली.
इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक 3 बळी घेतले. लीच व्यतिरिक्त इंग्लंडकडून गस ऍटकिन्सन आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी दोन, तर ख्रिस वोक्स, शोएब बशीर आणि रूट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.





