कामशेत, दि. २३ (वार्ताहर) – महामार्गालगत असलेली अतिक्रमणे अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या साहाय्याने काही काळापूर्वी हटवली होती. दोन वर्षांपासून वारंवार नोटिसा देऊनही अतिक्रमण न काढल्याने ही कारवाई करण्यात आली होती. महामार्गालगत पुणे बाजूने २५ मीटर तर मुंबई बाजूने ३५ मीटर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. या कारवाईत एकूण २५ दुकाने पाडण्यात आली होती. मात्र इंद्रायणी कॉलनी परिसरात पुन्हा एकदा अतिक्रमण वाढताना दिसत आहे. या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये पाणी शिरत असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत होते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आयआरबीने मोरी बांधली होती. परंतु संबंधित व्यावसायिकांनी त्या मोरीवर मोठ्या प्रमाणात मुरूम व भराव टाकून नैसर्गिक प्रवाह बंद केला आहे. मागील वर्षी अतिक्रमण विभागाने या ठिकाणी कारवाई करून भराव काढून टाकला होता. मात्र पुन्हा त्याच ठिकाणी व्यावसायिकांकडून दुकाने उभारली असून नैसर्गिक नाल्यावर भर टाकून प्रवाह बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांना पुन्हा मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे एमएसआरडीसी आणि पीएमआरडीएकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अतिक्रमण त्वरित हटवून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्ववत करावा, अन्यथा येत्या पावसाळ्यात पुन्हा घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होईल, अशी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. या अतिक्रमणाबाबत पीएमआरडीएकडे विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे.