पुणे जिल्हा | काठापूर बुद्रुक येथे अतिक्रमण हटवले

लाखनगाव, (वार्ताहर) – काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे वनविभागाच्या हद्दीतील गट. नं.१४५ मधील २० हेक्टरवरील लाकडी कोप्या व शेतीचे अतिक्रमण बुधवार, दि. ६ रोजी हटवल्याचे मंचर वनपरीक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी सांगितले.
२०१९ मध्ये काही लोकांनी या ठिकाणी वास्तव्यास आले होते. त्यांनी वनविभागाच्या हद्दीत जमीन कसण्यास सुरुवात करून ज्वारी, केळी, जनावरांचा चारा ही पिके घेण्यास सुरुवात केली होती. त्यांनी हे दावे ग्रामस्तरीय, जिल्हास्तर, उपविभाग स्तरावर दाखल केले होते. परंतु हे दावे फेटाळण्यात आले.
त्यानंतर वनविभागाच्या वतीने उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक संदेश पाटील, अमित भिसे यांच्या उपस्थितीत हे अतिक्रमण हटवण्यात आले. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाईसाठी पोलीस पथक उपलब्ध करून देण्यात आले होते.
यावेळी खेड वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ, घोडेगाव वनपरीक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे, ओतूर वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, जुन्नर वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, चाकण वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष कंक उपस्थित होते.
खेड उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या उपस्थितीत मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे, पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी तेरा कुटुंबांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईत दहा जेसीबी, ६ ट्रॅक्टर,पिकअप, टेम्पो यांचा वापर करण्यात आला. यावेळी अॅम्बुलन्स व अग्निशमन बंबही तैनात करण्यात आले होते.





