नाल्यांवरील अतिक्रमणे बिनबोभाट

पिंपरी महापालिका शहाणपण घेणार का?

पिंपरी – शहरातील ओढे, नाल्यांवर विविध ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. नदीपात्रामध्ये भराव टाकून नद्या गिळंकृत करण्याचा उद्योग सुरूच आहे. पिंपरी महापालिकेने नदीपात्रातील अतिक्रमणांबाबत कालबद्ध कार्यक्रम ठरवला असला तरी ओढे, नाल्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्‍न मात्र कायम आहे. पुणे महापालिकेने ओढे-नाल्यांमधील वाढती अतिक्रमणे रोखण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्याचे नियोजन केले आहे. पुणे महापालिकेकडून पिंपरी महापालिका शहाणपण घेणार का ? हा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

पुणे शहरातील ओढे आणि नाल्यांच्या भोवती मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. यंदा सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. ढगफुटीच्या घटनेमुळे पुण्यात आंबील ओढ्यासह इतर ओढे आणि नाल्यांनाही महापूर आला. या महापूरामुळे जीवित हानीसोबतच वित्तहानीही मोठ्या प्रमाणावर झाली. ढगफुटी आणि नाल्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यासोबतच ओढे-नाल्यांवर झालेली अतिक्रमणे यामुळे पुराची गंभीरता आधिकच वाढल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांबाबत गांभीर्याने विचार सुरू केला आहे. ओढे-नाल्यांच्या कडेने बेकायदेशीरपणे केलेल्या बांधकामांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्याचवेळी भविष्यात अशी परिस्थिती उद्‌भवू नये, यासाठी ओढे-नाल्यांच्या कडेला अतिक्रमणे होणार नाहीत, याची खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ओढे-नाल्यांच्या कडेला अतिक्रमणे होणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने ड्रोन कॅमेरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सध्या मुळा, पवना आणि इंद्रायणी नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र, शहरात नाल्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. तर, काही ठिकाणी नाल्यांवरच टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. तसेच, काही ठिकाणी नाल्यांवर झोपड्या देखील झाल्या आहेत. त्याबाबत महापालिका काय कारवाई करणार हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिका देखील ड्रोन कॅमेऱ्याद्वारे अतिक्रमणांवर लक्ष ठेवणार का ? महापालिकेकडे दुसरा काही प्रस्ताव आहे का, याबाबत स्पष्टता झालेली नाही. याविषयी शहर अभियंता राजन पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध झाले नाही.

नद्यांमध्ये भराव टाकून नदीपात्र गिळंकृत करण्याचा उद्योग
शहरातील पवना, इंद्रायणी आणि मुळा अशी तिन्ही नद्यांच्या पात्रामध्ये भराव टाकून नदीपात्र गिळंकृत करण्याचा उद्योग सध्या राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे नदीपात्र अरूंद झाले आहे. पर्यायाने, पूरस्थिती उद्‌भवल्यानंतर सांगवी, पिंपरी आदी भागांमध्ये नद्यांचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरते. हीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. नदीपात्रातील भराव टाकण्याचा उद्योग बंद व्हायला हवा, ही पर्यावरणप्रेमींची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, त्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन आहे. दरम्यान, आता प्रशासनाने नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याच्या यशापयशावरच शहरातील नद्या मोकळा श्‍वास घेणार का हे ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.