Encroachment: २ लाख ११३ चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त
Encroachment:

शहरातील अनेक महत्त्वाचे रस्त्यांसह चौकांनी घेतला मोकळा श्वास
Encroachment: शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात पुणे महापालिकेने शनिवारी (दि. २१) धडक कारवाई मोहीम राबवली.
बांधकाम विकास आणि अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करत शहरातील विविध भागांतील तब्बल २ लाख ११३ चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त केली. या कारवाईमुळे शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते आणि चौक मोकळे झाले आहेत.
महापालिकेने शहरातील पाच झोनमध्ये एकाच वेळी ही मोहीम राबवली. यामध्ये झोन क्रमांक दोन आणि पाचमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली. बिबवेवाडी येथील लेक टाउन सोसायटी ते डॉल्फिन चौक आणि महेश सोसायटी चौक या मुख्य रस्त्यावरील तब्बल ३८ हजार २०० चौरस फूट अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला.
हडपसर आणि वानवडी परिसरातील हडपसरच्या जुन्या हद्दीत साधना शाळेसमोर २७ हजार चौरस फूट, तर वानवडीतील साळुंखे विहार रस्त्यावर १० हजार ५०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली. वाघोली परिसरात (झोन १) बकोरी रोड येथे १२ हजार ५०० आणि आयव्ही इस्टेट रोडवर २ हजार ७०० चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली.
झोननिहाय आकडेवारीनुसार झोन दोनमध्ये ७५ हजार ९१३ चौरस फूट, झोन पाचमध्ये ७५ हजार ७००, झोन एकमध्ये २७ हजार, झोन चारमध्ये १८ हजार आणि झोन सहामध्ये ३ हजार ५०० चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. झोन तीन वगळता संपूर्ण शहरात महापालिकेचा हा बुलडोझर फिरल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.





