अतिक्रमणे जमीनदोस्त

देहूरोड येथे मोठी कारवाई ः अनेक दुकाने, टपऱ्या हटवल्या

देहूरोड – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने अतिक्रमण विरोधी पथकाच्या सहाय्याने लष्कर जवानांच्या बंदोबस्तात गुरुवारी ( दि.4 )कारवाई केली. इंदिरानगर , देहूरोड – विकासनगर रस्त्यावरील शंकर मंदिर परिसरात असलेली शासकीय जागेवरील विविध दुकाने, हॉटेल, सरकारी धान्य विक्री दुकान, टपऱ्या काढण्यात आले. तसेच रस्त्यावर व रस्त्यालगत असलेली असलेली लहान-मोठी अतिक्रमणे हटविण्यात आली. अतिक्रमण कारवाई सुरु केल्यानंतर काही दुकानदारांनी स्वतःहून दुकानातील सामान काढून घेतले. दुपारी बाराच्या सुमारास सुरु झालेली कारवाई साडे तीनच्या सुमारास थांबविण्यात आली.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वार्ड क्रमांक 3मध्ये शिवाजी विद्यालयाच्या मागील बाजूस इंदिरानगर येथे दोन पत्रा शेडवर कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आली. प्रभाग चार मध्ये विकासनगर -देहूरोड मुख्य रस्त्यालगत शंकर ,मंदिर परिसरात बांधण्यात आलेले एक हॉटेल, टपऱ्या, गॅरेज, पंक्‍चर दुकान तसेच एक फर्निचर दुकान, सरकारी धान्य विक्री दुकान, मासे विक्री दुकान व नाश्‍ता हाऊस यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काहींनी स्वतःहून दुकानातील सामान काढून घेतल्याने नुकसान झाले नसल्याचे सांगितले.

परिसरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले जाहिरातीचे फलक देखील या कारवाईपासून वंचित राहिले नाहीत. त्यांनतर देहूरोड मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर व पदपथावर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच विक्रेत्यांना समज देण्यात आल्याचे कार्यालय अधीक्षक पी.बी.शेलार यांनी सांगितले. दरम्यान शंकर मंदिर परिसरात नागरिकांनी कारवाई बाबत शंका उपस्थित केल्या. नोटीस देऊन कारवाई करणे आवश्‍यक असल्याचे मत काहींनी व्यक्‍त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, कार्यालय अधीक्षक पंढरीनाथ शेलार यांच्यासह अतिक्रमण विरोधी पथक, आरोग्य निरीक्षक किरण गोंटे, एम.ए.सय्यद स्थापत्य विभागीय अभियंता प्रवीण गायकवाड , एँथोनी टोनी, विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एक जेसीबी, एक डंपर, एक ट्रॅक्‍टर, यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.