पिरंगुट : मुळशीतील तरुणांना रोजगार मिळत नसल्याने स्थानिक तरुणांना गाव व तालुका सोडून शहरांमध्ये रोजगारासाठी जावे लागते. तरूणांना तालुक्यात रोजगार उपलब्ध करून, गावांसह तालुका आणि मतदारसंघाचा विकासासाठी मी कटीबद्ध असल्याची ग्वाही भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी दिली.
भोर, राजगड, मुळशी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ पिरंगुट येथे महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बूथ कमिटी बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कर्नाटकचे आमदार डॉ. वाय. ए. नारायण स्वामी, माजी आमदार शरद ढमाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस नंदूशेठ भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, कात्रज दुध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे, ज्येष्ठ नेते किसन नांगरे, राष्ट्रवादी काँग्रेस राजगडचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती बाबा कंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सचिन अमराळे, भाजप तालुकाध्यक्ष राजाभाऊ वाघ, भाजप युवा मोर्चाचे मुळशीचे तालुकाध्यक्ष अनुप मारणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुळशी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकजुटीची मूठ बांधली असून, या विधानसभा निवडणुकीत महायुती विजयाचा इतिहास घडविणार. त्यासाठी बूथ कमिट्या बळकट होत आहे.
शंकर मांडेकर, महायुतीचे उमेदवार
भोर, राजगड, मुळशी विधानसभा मतदारसंघ