पुणे | महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्याची असणारी कमतरता, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
युवकांसाठी प्रथम शासनाकडून मोफत जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात ५ प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करार असून, जर्मन भाषा शिकविण्यासाठी गोथे इन्स्टिट्यूट मॅक्समुलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
पथदर्शी तत्त्वावर सुरूवातीस विविध क्षेत्रातील किमान १० हजार कुशल मनुष्यबळ तातडीने या राज्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यासाठी हेल्थकेअर प्रोफेशन, प्रोफेशन इन हॉस्पिटॅलिटी व इतर क्षेत्रातील ३० कोर्सची निश्चिती करण्यात आली आहे. आयटीआयचे कोर्स पूर्ण झालेले विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेने सुरू केलेल्या https://www.maa.ac.in/GermanyEmployment या लिंकवर आपली नाव नोंदणी करू शकतात व या उपक्रमाची अधिक माहिती प्राप्त करून घेऊ शकतात.
लिंकवर नोंदणी केलेल्या व पात्र ठरणाऱ्या युवकांसाठी प्रथम शासनाकडून मोफत जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बाळकृष्ण वाटेकर यांनी दिली आहे.
शिक्षकांना आवाहन
एखाद्या कोर्ससंदर्भात बाडेन-वुटेनबर्ग व महाराष्ट्राचा अभ्यासक्रमात तफावत असल्यास ती दूर करण्यासाठी, तसेच गरज पडल्यास क्षेत्रनिहाय कौशल्य वृद्धीसाठी या युवकांना शासनाकडून मोफत कौशल्य वृद्धीचे अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नोंदणी केलेल्या युवकांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षक आवश्यक आहेत. त्यासाठी पुणे जिल्ह्यामधील शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळां मधील जर्मन भाषा शिकवण्याची आवड असणाऱ्या शिक्षकांनी https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7
या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

