पिंपरी | सारंग येथील नव्या कंपनीत भूमिपुत्रांना रोजगाराची हमी

खालापूर (वार्ताहर) – सारंग येथे एका खासगी कंपनीने जमीन खरेदी केली असून लवकरच व्यवसाय उभारणी होणार आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणार आहे. यासाठी नव्वद टक्के शेतकऱ्यांनी पाठींबा दिला आहे, असे मत घनशाम गरुडे यांनी व्यक्त केले. नुकतीच संघर्ष समितीच्या माध्यमातून सारंग येथील शेतकऱ्यांनी संबंधित कंपनी व्यवस्थापकांची भेट घेतली आणि ग्रामस्थांच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
खालापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत असली तरी या औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दुसरीकडे सारंग येथे नव्याने सुरू होत असलेल्या मे.क्लेरीझेस एस.इ.झेड. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने स्थानिकांना विश्वासात घेत व्यवसायाला सुरूवात केल्याने या उद्योगाला नव्वद टक्के जमीन मालकांनी पाठींबा दिला असून अनेक कुटुंबाचा रोजगाराचा प्रश्न त्यामुळे मिटणार आहे.
कंपनीने जो प्रोजेक्ट उभारला आहे, तो गावासाठी चांगला आहे. प्रोजेक्टमधून स्थानिकांना रोजगार मिळत असल्याने स्थानिकांना नोकरीसाठी भविष्यात बाहेरगावी जावे लागणार नाही. दलित वस्तीसाठी रस्ता, पाण्याच्या टाकीसाठी जागा, समाज मंदिरसाठी जागा दिली असून स्मशानभूमीचे काम सुरू आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर कंपनी व्यवस्थापनाने बांधून दिल्याने कंपनी ग्रामस्थांना चांगले सहकार्य करत आहे.’ – रमेश गायकवाड, सरपंच
कंपनीने आमच्या सारंग आदिवासी वाडीला दत्तक घेतले आहे. त्यामुळे कंपनीच्या माध्यमातून आमची सर्व कामे होत असून कंपनी आम्हाला विश्वासात घेत रोजगार देत आहे. – बाळाराम कातकरी, आदिवासी बांधव
कंपनीला नव्वद टक्के शेतकऱ्यांचा पाठींबा आहे. कंपनी आम्हा सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करत असल्याने कंपनीच्या कारभाराबाबत आम्ही समाधानी आहोत. – घनशाम गरुडे, ग्रामस्थ





