पिंपरी | उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने रोजगार मेळावा

कर्जत, (वार्ताहर) – कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील खालापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत असली तरी या मतदारसंघातील तरुणांना रोजगारासाठी वणवण भटकावे लागत आहे.
त्यातच अनेक तरुण – तरुणी बेरोजगारीचा सामना करीत असताना मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या माध्यमातून 3 ऑगस्ट रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन कर्जत मधील रॉयल गार्डन येथे करण्यात येणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील तरुण-तरुणींना रोजगार मिळावा या उद्देशाने 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते 2 वाजेपर्यंतच्या वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या रोजगार मेळाव्यात ५0 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे, त्याचबरोबर विविध नामांकित कंपन्यांमधून ऑन द जॉब ट्रेनिंगची रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
त्यामुळे या रोजगार मेळाव्यात कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील तरुण-तरुणीनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी केले आहे.





