पुणे : शहरातील मध्यवर्ती पेठांमधील व्यावसायिक परिसराचा समावेश असलेल्या शुक्रवार पेठ परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या उपाययोजनांसाठी स्वतंत्र आराखडा, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पदपथ, तसेच मुख्य चौकांचे सुधारीत नियोजन आणि व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे आश्वासन प्रभाग २५ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार कुणाल शैलेश टिळक यांनी मतदारांना दिले. टिळक यांच्या प्रचारार्थ रविवारी शुक्रवार पेठ परिसरात पदयात्रा काढण्यात आली. शुक्रवार पेठेतील वनराज चौक येथून करण्यात आली. पदयात्रेदरम्यान टिळक यांनी परिसरातील रहिवासी व व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही ते मतदारांशी बोलताना म्हणाले. या पदयात्रेदरम्यान नागरिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी इतर उमेदवार, तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून पदयात्रेला पाठिंबा दर्शवत होते. नागरी सुविधा, स्वच्छता, वाहतूक व स्थानिक प्रश्नांबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या मतांची नोंद घेत टिळक यांनी प्रभागाच्या विकासासाठी समन्वयाने काम करणार असल्याचे स्पष्ट केले.