पुणे जिल्हा | कौशल्याधिष्टीत शिक्षणासह रोजगार निर्मितीवर भर

माळेगाव, (वार्ताहर) – कौशल्याधिष्टीत शिक्षणासह रोजगार निर्मितीवर राज्यशासनाचा भर आहे. जागतिक पातळीवर काम करणारे विद्यार्थी निर्माण झाले पाहिजेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामांतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँक संचालक दत्तात्रय येळे, रणजित तावरे, कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, माजी सरपंच दीपक तावरे, जयदीप तावरे, शिवराज राजे जाधवराव, पोपटराव गावडे, सचिन सातव, संगिता जाधव, प्राचार्य अवधुत जाधवर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिर उभारले असून विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधान निर्मितीचा इतिहास, शिकवण व महत्व कळाले पाहिजे.
या संस्थेत शिकणार्या बारामतीत विद्या प्रतिष्ठान व शारदा नगर येथील शिक्षण संस्थेसारख्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते औंध येथील छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सावित्रीबाई फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे आभासी पध्दतीने नामांतर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अवधुत जाधवर, सुत्रसंचलन प्रा. अनिल धुमाळ तर गटनिदेशक संतोष सपकळ यांनी आभार मानले.
तातडीने एक कोटींचा निधी दिला
बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास दादांनी केला असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील दुरावस्था पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने 1 कोटी रुपयांचा निधी दिला.





