खालापूर – जानेवारी दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूका होण्याचे संकेत मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र यावेळी उमेदवारीसाठीचा निकष बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. विकासकामे आणि जनसंपर्क न पाहता आर्थिक सामर्थ्य हेच उमेदवारीसाठीचे प्रमुख मापदंड ठरणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे. खालापूर आणि कर्जत परिसरात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप या महायुतीतील पक्षांमध्येच उमेदवारीवरून अंतर्गत संघर्ष उफाळला असल्याचे दिसत आहे. राज्यात महायुती सरकार असूनही स्थानिक पातळीवर मात्र कोणाला उमेदवारी द्यायची, यावरून गटागटांत वाद सुरू आहेत. काही ठिकाणी तर कर्जत तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी खालापूरमधून उमेदवारी मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. प्रमुख पक्षांच्या बैठकीत इच्छुक उमेदवारांना आता आपली आर्थिक तयारी कितपत आहे, अशी सरळ विचारणा होत असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत सांगत आहेत की, पक्षाकडून मोठा फंड मिळणार नाही. उमेदवार स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. काही पक्षांनी तर उमेदवारांकडून थेट आर्थिक अंदाजपत्रकाची माहिती मागवली असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. खालापूर, कर्जत आणि खोपोली परिसरातील आगामी निवडणुका या वेळी विकासाच्या मुद्द्यांपेक्षा पैशांच्या जोरावर लढल्या जाण्याची शक्यता अधिक आहे. महायुतीतील अंतर्गत मतभेद, आर्थिक निकष आणि स्थानिक स्तरावरचे सत्तेचे गणित यामुळे या निवडणुका रंगतदार, पण विकासविहीन ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विकासाचा मुद्दा पडतोय मागे पूर्वी जनसंपर्क चांगला असणारा आणि विकासकामांत सक्रिय असलेला कार्यकर्ता आपोआप उमेदवार ठरायचा. मात्र आता स्थिती उलटली आहे. विकास हा मुद्दा बाजूला पडून पैशांची ताकद निवडणूक ठरवणार असल्याचे चित्र आहे. खालापूर तालुक्यातील आणि खोपोली नगरपरिषद क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले की, काम करणाऱ्या, पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत कार्यकर्त्यांकडे आता दुर्लक्ष होणार, तर काहींनी आता कामापेक्षा पैसा महत्त्वाचा ठरत असल्याची निराशा व्यक्त केली आहे. प्रचार मोहीमेला सुरुवात आरक्षण सोडतीच्या प्रतीक्षेत असलेले इच्छुक उमेदवार आधीच मैदानात उतरले असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात दिसत आहे. गावोगावी बैठका, सणासुदीच्या निमित्ताने बॅनरबाजी, भेटीगाठी आणि विविध उपक्रम यामुळे खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. गावच्या वेशीवर प्रत्येक गल्लीत बॅनर लागले असून, उमेदवारांच्या समर्थकांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. आर्थिक निकषांमुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंता या नव्या आर्थिक अटींमुळे खऱ्या अर्थाने काम करणारे अनेक कार्यकर्ते आता मैदानाबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षनिष्ठ, जनसंपर्क आणि विकासाचे आश्वासन देणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा आता नेत्यांचा विश्वास आणि आर्थिक सामर्थ्य असलेले उमेदवारच पुढे येतील, असे स्थानिक पातळीवरील निरीक्षक सांगतात. खालापूरात काही कर्जत येथील श्रीमंत इच्छुक उमेदवारांनीही येथे लढण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षनिहाय हालचाली तीव्र खालापूर तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती सदस्यपदांसाठी आणि खोपोली नगरपालिकेसाठी पक्षपातळीवरील हालचाली वेगाने सुरू आहेत. शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात संघर्ष वाढत आहे. भाजप मात्र या अंतर्गत संघर्षाचा फायदा घेण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे शिवसेनाही (ठाकरे गट) स्थानिक पातळीवर सक्रिय झाली आहे. पक्षाच्या फंडावर अवलंबून न राहता स्वतःची आर्थिक बाजू मजबूत ठेवा अश्या सुचना प्रत्येक पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्या जात आहेत.