नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे : मुळा टीबीएम मशीनचे अनावरण
पुणे – मोठ्या शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर राज्य सरकार भर देणार आहे. शहरातील मेट्रो सक्षम करणार असून, ती वाहतूक कोंडी सोडवण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी स्पष्ट केले.
मेट्रोच्या भुयारी कामासाठी मुळा या दुसऱ्या टीबीएम मशीनचे शिंदे यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी त्यांनी मेट्रो कामाची पाहणी केली. मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, आमदार अनिल भोसले, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे आदी उपस्थित होते.
नगरविकास सारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मूलभूत सोयीसुविधांशी निगडित हे खाते आहे. राज्याला विकासाच्या दृष्टीने पुढे नेणारे हे खाते आहे. ज्या राज्याची दळणवळण व्यवस्था सक्षम असते त्या राज्याचा विकास झपाट्याने होतो. त्यामुळे राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगले काम या खात्याच्या माध्यमातून करणार आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन 50 वर्षांचे नियोजन करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्यात पुणे, मुंबई, ठाणे यासह इतर शहरांत मेट्रोचे काम सुरू आहे. ज्यामुळे नागरिकांची वेळ वाचेल वाहतूक कोंडीतून सुटका होऊन प्रदूषण कमी होणार आहे.
पुणे मेट्रोचा पहिला टप्पा 31 किलोमीटरचा आहे. त्यातील 5 किमी भुयारी मार्ग आहे. मेट्रो प्रकल्पाला 11 हजार कोटी खर्च येणार आहे. मेट्रोचा 5 किमीचा टप्पा मार्च ते एप्रिलदरम्यान सुरू होईल तर, 2022 मध्ये पूर्ण मेट्रो कार्यान्वित होईल. त्यानंतर रोज 5 ते 6 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे.